![]()
संगीत ही केवळ कला नसून मानसिक, भावनिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी एक प्रभावी उपचारपद्धती आहे. हे लक्षात घेऊन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मान्यतेने ‘सुर संजीवन (क्युरेटिव्ह म्युझिक)’ हा संगीत चिकित्सा पदविका अभ्यासक्रम सुरू होत आहे. सूर संजीवन म्युझिक थेरपी ट्रस्टतर्फे हा अभ्यासक्रम 15 सप्टेंबरपासून सुरू होईल. ट्रस्टचे संस्थापक आणि ज्येष्ठ सतारवादक डॉ. पंडित शशांक कट्टी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या अभ्यासक्रमाविषयी अधिक माहिती देण्यासाठी येत्या रविवारी (13 सप्टेंबर) सायंकाळी 5 ते 7 या वेळेत कर्नाटक संघ, सिद्धार्थ टॉवर्स, कोथरूड, पुणे येथे संगीतविषयक विनामूल्य सेमिनारचे आयोजन केले आहे. डॉ. शशांक कट्टी यांनी सांगितले की, संगीत ही एक प्रभावी उपचारपद्धती आहे. या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक आधारावर संगीत चिकित्सेचे ज्ञान मिळेल. संगीताच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची ही एक चांगली संधी आहे. हा अभ्यासक्रम जगभरात ऑनलाइन उपलब्ध आहे, तसेच पुणे आणि मुंबई येथे ऑफलाइन स्वरूपातही उपलब्ध असेल. एक वर्षाचा हा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे (शासकीय मान्यताप्राप्त) पदविका प्रमाणपत्र मिळेल. यामुळे त्यांना करिअरच्या उत्तम संधी निवडण्यास मदत होईल. संगीत क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच डॉक्टर, समुपदेशक, विशेष बालशिक्षक, मानसोपचारतज्ज्ञ आणि समाजकार्य क्षेत्रातील व्यावसायिकांसाठीही हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल. डॉ. संगीता सांगवीकर यांनी सांगितले की, आतापर्यंत डॉ. कट्टी यांनी 450 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. त्यापैकी 80 ते 90 विद्यार्थी हे प्रॅक्टिस करणारे डॉक्टर आहेत आणि अनेकजण संगीत चिकित्सा प्रत्यक्ष वापरत आहेत. नव्याने सुरू होणाऱ्या या अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. डॉ. पंडित शशांक कट्टी यांनी पुढे सांगितले की, याआधी म्युझिक थेरपीचा सर्टिफिकेट अभ्यासक्रम होता. पण आताच्या अभ्यासक्रमाला शासनाची मान्यता मिळाल्याने, जे विद्यार्थी हा कोर्स करतील त्यांना सरकारी मान्यता मिळेल आणि ते म्युझिक थेरपी विषयात प्रॅक्टिस करू शकतील. आपल्याकडे या थेरपीबद्दल पुरेशी जागरूकता नाही. यामध्ये तीन प्रकारचे संगीत शिकवले जाईल.
Source link
यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचा संगीत चिकित्सा पदविका अभ्यासक्रम सुरू:‘सुर संजीवन’ 15 सप्टेंबरपासून; डॉ. शशांक कट्टी यांनी दिली माहिती