![]()
पुण्याचा समृद्ध इतिहास आणि सांस्कृतिक वारसा नव्या पिढीसमोर आणण्यासाठी पुणे फेस्टिव्हलने लघुपट स्पर्धेचे आयोजन केले आहे. ‘इतिहासाचा वारसा… पुण्याचा आरसा!’ या संकल्पनेवर आधारित ही स्पर्धा आहे. या स्पर्धेची संकल्पना आणि संयोजन ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांचे आहे. तर, दिग्दर्शन सुनील नाईक करणार आहेत. या स्पर्धेची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, जनरल सेक्रेटरी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, तसेच विश्वस्त मोहन टिल्लू उपस्थित होते. पुण्याच्या इतिहासाशी संबंधित कथा, व्यक्ती, वास्तू, महत्वाच्या घटना, परंपरा आणि सांस्कृतिक ठेवा चांगल्या प्रकारे मांडण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेसाठी आयोजक विषय देणार आहेत. स्पर्धकांना त्या विषयावर पाच ते दहा मिनिटांचा लघुपट तयार करावा लागेल. या स्पर्धेमुळे कलावंतांना इतिहास, संस्कृती, परंपरा आणि घटनांकडे क्रिएटिव्ह आणि सिनेमॅटिक पद्धतीने पाहण्याची संधी मिळेल. प्रभावी कथा, चांगले शूटिंग, सुंदर छायांकन, परिणामकारक व्हॉइस ओव्हर, पार्श्वसंगीत, नाट्यात्मक दृश्यरचना आणि कल्पक मांडणी यांचा वापर करता येईल. नवोदित तसेच अनुभवी कलावंतांना आपली कला मोठ्या प्रमाणावर दाखवण्यासाठी ही स्पर्धा एक महत्वाचे माध्यम ठरेल. पुण्याच्या इतिहासाला नव्या सिनेमॅटिक नजरेतून जगासमोर आणण्याची संधी स्पर्धकांना मिळेल. लघुपटाचा कालावधी पाच ते दहा मिनिटे असावा. तो MP4 किंवा MOV फॉरमॅटमध्ये आणि 1080p रिझोल्यूशनमध्ये सादर करावा लागेल. स्पर्धेत पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्यांना रोख बक्षीस, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र दिले जाईल. दिग्दर्शन, शूटिंग आणि रेकॉर्डिंगसाठी खास बक्षीसही दिले जातील. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2026 आहे.
Source link
पुणे फेस्टिव्हलतर्फे लघुपट स्पर्धेचे आयोजन:‘इतिहासाचा वारसा… पुण्याचा आरसा!’ संकल्पनेतून उलगडणार शहराचे वैभव