Headlines

वाघापेक्षा भयानक ठरलं महायुती सरकारचं अपयश!:गडचिरोलीत विद्यार्थ्यांची रोज 3 किमी जंगलातून पायपीट; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल




राज्यात एकीकडे महायुती सरकारकडून हजारो कोटींच्या योजना आणि विकासाच्या मोठमोठ्या जाहिरातींचा गाजावाजा केला जात असताना, दुसरीकडे गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात शिक्षणासाठी आदिवासी विद्यार्थ्यांना रोज मृत्यूच्या दाढेतून प्रवास करावा लागत आहे. एटापल्ली तालुक्यातील गोटाटोला गावातील अवघ्या ११ चिमुकल्यांना वाघाचा धोका असलेल्या जंगलातून रोज ३ किलोमीटर पायी चालत शाळा गाठावी लागते. या धक्कादायक वास्तवावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त करत, ‘वाघापेक्षा भयानक महायुती सरकारचे अपयश ठरले आहे,’ अशा शब्दांत राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. चिमुकल्यांचा जीवघेणा प्रवास विजय वडेट्टीवार यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यावरून या विद्यार्थ्यांच्या समस्येकडे लक्ष वेधले आहे. गोटाटोला गावातील हे ११ लहान विद्यार्थी शिक्षणाची भूक भागवण्यासाठी रोज जीव मुठीत धरून घनदाट जंगलातून पायी प्रवास करतात. या मार्गावर हिंस्र प्राण्यांचा, विशेषतः वाघांचा मोठा धोका आहे. तरीही भविष्याच्या आशेवर ही मुले रोज हा जीवघेणा प्रवास करत आहेत. या भीषण वास्तवावर बोट ठेवत वडेट्टीवारांनी सरकारच्या असंवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सरकारवर ‘निर्लज्जपणा’चा आरोप सरकारच्या धोरणांवर टीका करताना वडेट्टीवार म्हणाले, “सरकार सध्या विकासाच्या जाहिरातींमध्ये मश्गूल आहे. हजारो कोटींच्या योजना, मोठमोठ्या घोषणा आणि चमकदार प्रचारासाठी सरकारकडे भरपूर पैसा आहे; पण आदिवासी भागातील या लेकरांना सुरक्षित शाळा आणि वाहनाची व्यवस्था करण्यासाठी सरकारकडे साधी इच्छाशक्तीही उरलेली नाही. ही केवळ बेपर्वाई नाही, तर दुर्गम भागातील मुलांच्या आयुष्याशी खेळण्याची सरकारची निर्लज्ज वृत्ती आहे.” विशेष कृती आराखड्याची मागणी जंगलातून शाळेत जाणाऱ्या प्रत्येक चिमुकल्याच्या पावलावर सरकारच्या अपयशाची छाप असल्याचे सांगत, वडेट्टीवारांनी राज्य सरकारकडे दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत. गोटाटोला गावातील या विद्यार्थ्यांसाठी सरकारने तातडीने कायमस्वरूपी आणि सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी त्यांची पहिली मागणी आहे. तसेच, संपूर्ण राज्यातील आदिवासी आणि दुर्गम भागातील शिक्षणासाठी सरकारने तातडीने एक विशेष कृती आराखडा जाहीर करावा, असा मागणीही त्यांनी केली आहे. “आता पोकळ घोषणा नकोत, तर सरकारने आपले उत्तरदायित्व सिद्ध करावे,” असा इशाराही विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. हेही वाचा.. ठाण्यात ठाकरे गटाच्या विभागप्रमुखाची गोळ्या झाडून हत्या: पूर्णेकर कुटुंबीयांचे माजी महापौरांवर गंभीर आरोप, घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची मंगळवारी रात्री गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे ठाण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मानपाडा परिसरातील क्लस्टर डेव्हलपमेंट आणि राजकीय वर्चस्वाच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत असून, पूर्णेकर कुटुंबीयांनी ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर या हत्येचे सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप केला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *