Headlines

वाघिणीने हल्ला करत शेतकऱ्याला केले ठार:वन विभागाची 24 तास गस्त; ड्रोन कॅमेरे तैनात‎




मोर्शी तालुक्यातील भांबोरा येथे शेतात काम करणाऱ्या ५२ वर्षीय शेतकऱ्यावर वाघिणीने हल्ला केल्याची घटना गुरुवारी (दि. २७) सकाळी साडेनऊ ते दहा वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, संबंधित वाघिणीने त्यापूर्वी याच परिसरात दोघांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, एकाने पळ काढून, तर दुसऱ्याने पाण्यात उडी घेऊन आपला जीव वाचवला. त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात वाघिणीने शेतकऱ्यावर हल्ला केला. मृतक शेतकऱ्याचे नाव चरणदास वासुदेवराव इखे (५२, रा. भांबोरा, ता. मोर्शी) असे आहे. ते गुरुवारी सकाळी शेतात निंदणाच्या कामासाठी गेले होते. दरम्यान, इखे यांचा मुलगा वडिलांसाठी डबा घेऊन शेतात गेला असता त्याला ते दिसून आले नाहीत. त्याचवेळी शेतात रक्ताचे डाग तसेच प्राण्याच्या हल्ल्याच्या खुणा आढळून आल्या. त्याने आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूचे शेतकरी घटनास्थळी धावून आले. शेतापासून सुमारे ३०० मीटर अंतरावर वाघिणीने इखे यांचा मृतदेह ओढत नेला होता. इखे यांच्यावर हल्ला करण्यापूर्वी याच वाघिणीने परिसरातील एका २० वर्षीय तरुणावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. त्याने प्रसंगावधान राखत पाण्यात उडी मारून स्वतःचा बचाव केला. १० जवानांचे पथक तैनात प्राथमिकदृष्ट्या हा हल्ला वाघिणीनेच केला असावा. वर्धा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एका वाघिणीने हल्ला केला होता. संबंधित वाघिणीला पकडण्याची परवानगी वर्धा वन विभागाला मिळाली आहे.वाघिणीच्या शोधासाठी भांबोरा तसेच परिसरातील गावांमध्ये २४ तास गस्त सुरू करण्यात आली आहे. प्रत्येकी दहा जवानांचे पथक तैनात करण्यात आले असून, ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातूनही शोधमोहीम राबवली जात आहे. – मयुर भैलूमे, एसीएफ मोर्शी.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *