Headlines

वायएसपीच्या दाव्यामुळे भाजपच्या अडचणी वाढल्या:काँग्रेसकडे वासंती मंगरोळे, हर्षजीत देशमुख यांची उमेदवारी मागणी




अमरावती: विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात आमदार रवि राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने (वायएसपी) दावा केल्याने भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत. दुसरीकडे, काँग्रेसकडे दोन इच्छुकांनी उमेदवारी मागितल्याने या निवडणुकीची रंगत अधिक वाढली आहे. सूत्रांनुसार, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य वासंती मंगरोळे यांनी ही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच, नागपूरचे उद्योजक हर्षजीत देशमुख यांनी थेट काँग्रेस श्रेष्ठींची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली आहे. गेल्यावेळी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजपने केले होते. यावेळी ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी होणार आहे. महायुतीमध्ये भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राणांची वायएसपी या चार प्रमुख पक्षांचा समावेश आहे. बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाचीही नव्याने एंट्री झाली आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे प्रमुख पक्ष आहेत. एकूण ४५३ मतदारांपैकी महायुतीकडे २५१ मते असून, महाविकास आघाडीकडे १५१ मते आहेत. २५ अपक्षांसह ५० जणांचा एक तिसरा गटही आहे. महाविकास आघाडीत ही जागा पारंपरिकरित्या काँग्रेसच्या वाट्याला येते. मात्र, काँग्रेसकडून सध्या कुणीही तयारी दर्शवलेली नाही. त्यामुळे इतर पक्षांतील नेत्यांनी काँग्रेसकडे उमेदवारीसाठी संपर्क साधला आहे. काँग्रेसच्या तिकिटावरच निवडणूक लढण्याची अट असल्याने काहीसा पेच निर्माण झाला आहे. भाजपमध्ये या जागेसाठी माजी पालकमंत्री प्रवीण पोटे आणि भाजप शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांची नावे चर्चेत होती. परंतु, भाजपने ही जागा मित्रपक्ष वायएसपीला द्यावी, अशी मागणी पुढे आल्याने सध्या चर्चेला विराम मिळाला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *