![]()
संशोधनाद्वारे राज्य तथा राष्ट्रविकासात संशोधकांनी योगदान द्यावे, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी संशोधकांना केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील शैक्षणिक विभाग तसेच संलग्नित महाविद्यालयांमधील शिक्षकांच्या संशोधन कार्याला प्रोत्साहन व चालना देण्याच्या उद्देशाने राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाच्या माध्यमातून विद्यापीठातील २१ शिक्षकांना मायनर रिसर्च प्रोजेक्ट अंतर्गत ५५ लाख ५ हजार रुपयांच्या संशोधन निधीचे वितरण करण्यात आले. सर्व लाभार्थ्यांना आयोजित कार्यक्रमात संशोधन प्रकल्पांची मंजुरीपत्रे कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आरजीएसटीसीच्या समन्वयक तथा जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. अनिता पाटील उपस्थित होत्या. मार्गदर्शन करताना कुलसचिव पुढे म्हणाले, विद्यापीठातील संशोधन संस्कृती अधिक बळकट करण्यासाठी आणि शिक्षकांना संशोधनाच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. डॉ. अनिता पाटील म्हणाल्या, प्रकल्पांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणे अत्यंत महत्त्वाचे असून या माध्यमातून विद्यापीठाचे, महाविद्यालयाचे नाव कसे मोठे करायचे, यावर देखील संशोधकांनी भर द्यावा. २०२०-२१ मध्ये आरजीएसटीसीने विद्यापीठाला ५० लाख रुपयांचा संशोधन निधी मंजूर केला होता. या निधीतून विविध शिक्षकांना मायनर रिसर्च प्रोजेक्टसाठी आर्थिक सहाय्य देण्यात आले. पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर आयोगाने उर्वरित ७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. तसेच २०२४-२५ मध्ये वितरित करण्यात आलेल्या ५० लाख रुपयांच्या निधीमध्ये या रकमेची भर पडली. मागील टप्प्यात १७ लाभार्थ्यांना निधी वितरित करण्यात आला होता, तर यावर्षी २१ लाभार्थ्यांची निवड करून त्यांना संशोधनासाठी आर्थिक सहाय्य देण्यात आले. आरजीएसटीसीच्या समन्वयक डॉ. अनिता पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “संशोधन प्रकल्पांमध्ये केवळ शिक्षकांनीच गुंतून न राहता विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. या संशोधन प्रकल्पांच्या माध्यमातून विद्यापीठ आणि आपल्या महाविद्यालयाचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कसे उज्ज्वल होईल, याकडे संशोधकांनी विशेष लक्ष दिले पाहिजे.” ही संपूर्ण प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करून लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वितरित केल्याबद्दल कुलसचिव डॉ. असनारे यांनी आरजीएसटीसीच्या समन्वयक डॉ. अनिता पाटील, विकास विभागाच्या उपकुलसचिव डॉ. सुलभा पाटील तसेच त्यांच्या संपूर्ण चमूचे विशेष कौतुक केले. या प्रक्रियेत विकास विभागातील उच्चश्रेणी लिपिक उदय कुलकर्णी, कोमल पाटील, कोमल काळबांडे यांनी महत्त्वपूर्ण योगदान देत संपूर्ण कामकाज सूत्रबध्द पद्धतीने पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. संशोधन निधी मिळाला तर विद्यार्थ्यांची विविध विषयांत संशोधन करण्याची आवड वाढून त्यांना प्रोत्साहन मिळेल. ही बाब रोजगार मिळवण्यासाठीही विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर राहणार आहे. उच्च शिक्षणाचे काय फायदे असतात, याची इतर विद्यार्थ्यांना निश्चितच जाणीव होईल,अशी प्रतिक्रीया कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी दिली. ९ महिन्यांच्या कालावधीत प्रक्रिया पूर्ण मायनर रिसर्च प्रोजेक्टच्या संपूर्ण प्रक्रियेची जबाबदारी विद्यापीठाच्या विकास विभागाने यशस्वीरीत्या पार पाडली. जवळपास नऊ महिन्यांच्या कालावधीत विविध टप्प्यांमधून ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. संशोधन प्रकल्पांची छाननी, मूल्यमापन आणि मंजुरी यासाठी विविध समित्यांची नियुक्ती करण्यात येते. या दोन्ही समित्यांचे अध्यक्ष कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते असून त्यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण प्रक्रिया अत्यंत काटेकोरपणे, पारदर्शक व नियोजनबध्दतेने राबवण्यात आली.
Source link
विद्यापीठातील 21 संशोधकांना तब्बल 55 लाख रुपयांच्या निधीचे वितरण:संशोधकांनी राष्ट्रविकासात योगदान द्यावे- कुलसचिव डॉ. अविनाश असनारे