Headlines

विद्यार्थ्यांनी ज्ञान राष्ट्र उभारणीसाठी वापरावे:उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांचे आवाहन; सिम्बायोसिसच्या पदवीप्रदान समारंभात 12 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके




विद्यार्थ्यांनी मिळवलेले ज्ञान आणि कौशल्य समाजकल्याण व राष्ट्र उभारणीसाठी वापरावे, असे आवाहन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. शिक्षण हे पदवी किंवा रोजगार मिळवण्याचे साधन नसून व्यक्तिमत्त्व, चारित्र्य आणि नैतिक मूल्ये घडवण्याचे माध्यम आहे, असेही ते म्हणाले. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या २३ व्या पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते. या वेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एस. बी. मुझुमदार, कुलपती डॉ. विद्या येरवडेकर आणि कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण उपस्थित होते. व्यावसायिक यशाबरोबर चारित्र्य, प्रामाणिकपणा आणि नैतिक मूल्ये जपणे महत्त्वाचे आहे, असे राधाकृष्णन म्हणाले. यश मिळवताना मूल्यांशी तडजोड करू नये आणि आयुष्यभर शिकण्याची वृत्ती ठेवून आव्हानांना धैर्याने सामोरे जावे, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. गरजूंची मदत करणे आणि ज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी करणे, हेच खरे यश आहे. जगात कुठेही गेल्यानंतर भारतीय संस्कृती आणि मूल्यांचा अभिमान बाळगून आपल्या कामातून देशाची प्रतिमा उंचावावी, असेही त्यांनी सांगितले. विकसित भारतासाठी तरुणांचे योगदान २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यात तरुणांची भूमिका निर्णायक असेल, असे राधाकृष्णन म्हणाले. विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन आणि कौशल्य विकासातून राष्ट्रीय तसेच जागतिक गरजा पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे, असे त्यांनी आवाहन केले. सिम्बायोसिसमध्ये शिकणाऱ्या ३२ हजार विद्यार्थ्यांपैकी १९ हजारांहून अधिक विद्यार्थिनी आहेत. शिक्षणातील महिलांचा वाढता सहभाग अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यपाल जिष्णू देव वर्मा म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता, जैवतंत्रज्ञान आणि डिजिटल बदलांमुळे जग वेगाने बदलत आहे. हे बदल स्वीकारताना मानवी मूल्ये, नैतिकता, करुणा आणि सामाजिक जबाबदारी जपली पाहिजे. विद्यापीठांनी रोजगारक्षम विद्यार्थ्यांसोबत संशोधन करणारे, समस्यांवर उपाय शोधणारे आणि जबाबदार नेतृत्व करणारे नागरिक घडवावेत, असे वर्मा म्हणाले. सिम्बायोसिसच्या रुग्णालयातून दिल्या जाणाऱ्या मोफत आरोग्यसेवा आणि परिसरातील ३५ गावांमध्ये राबवले जाणारे उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांसाठी ‘ईशान्य भवन’ उभारणे आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या विद्यापीठाच्या कामाचाही त्यांनी उल्लेख केला. कुलगुरू डॉ. रमण यांनी वार्षिक अहवालातून विद्यापीठाच्या प्रगतीची माहिती दिली. डॉ. विद्या येरवडेकर यांनी स्वागत केले. विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. उपराष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ट परदेशी विद्यार्थ्याचा पुरस्कार देण्यात आला. समारंभात १२ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *