Headlines

विधान परिषदेच्या जागावाटपावरून महायुतीत पेच:शिवसेनेचा 7 जागांवर ठाम दावा, भाजपकडून केवळ 3 ते 4 जागा सोडण्याची तयारी




महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, सत्ताधारी महायुतीमध्ये जागावाटपाचा मोठा पेच निर्माण झाल्याचे चित्र सध्या समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने या निवडणुकीत तब्बल 7 जागांवर आपला ठाम दावा सांगितला आहे. ज्यामध्ये आधीच्या 5 जागा आणि नव्याने वाढलेल्या ताकदीच्या आधारावर अतिरिक्त 2 जागा, अशा एकूण 7 जागांचा अधिकृत प्रस्ताव त्यांनी भाजपसमोर ठेवल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, शिवसेनेच्या या प्रस्तावाला भाजपकडून फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. समोर आलेल्या माहितीनुसार, भाजप शिवसेनेला केवळ 3 ते 4 जागा सोडण्याच्या तयारीत आहे. असे असले तरी, शिवसेना आपल्या 7 जागांच्या मागणीवर ठाम राहिल्याने जागावाटपाचा हा तिढा आणखी वाढला असून, शिवसेनेने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे महायुतीत जागावाटपावरून भाजपचीच कोंडी झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली. विधानपरिषदेच्या उमेदवारीबाबतचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच घेतील, असे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, यापूर्वी धुळे आणि कोकण पट्ट्यात आमचे 5 आमदार होते आणि आता पक्षाची ताकद अधिक वाढल्यामुळेच आम्ही 7 जागांची रास्त मागणी केली असून, याबाबत महायुतीचे सर्व प्रमुख नेते एकत्र बसून अंतिम निर्णय घेतील. शिवसेनेच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा, विधानसभा आणि आगामी महापालिका निवडणुकांच्या जागावाटपात पक्षाची ताकद अधिक असूनही नेहमीच कमी जागांवर तडजोड करावी लागल्याची सल नेते आणि कार्यकर्त्यांच्या मनात आजही कायम असल्याने, आता कोणत्याही परिस्थितीत माघार न घेण्याचा निर्णय पक्षाने घेतला असून, आगामी विधान परिषद निवडणुकीत पुन्हा तीच तडजोड खपवून घेतली जाणार नाही, अशी अत्यंत आक्रमक भूमिका शिवसेनेने घेतली आहे. विधान परिषदेच्या जागांसाठी महायुतीमध्ये सुरुवातीला ठरलेल्या प्राथमिक फॉर्म्युल्यानुसार भाजप 12, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार असल्याची चर्चा होती. महायुती म्हणून एकत्र लढण्यावर तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचे एकमत होऊन काही पारंपरिक जागांची अदलाबदल केली जाणार असल्याचेही निश्चित झाले होते, मात्र आता शिवसेनेने थेट 7 जागांची मागणी केल्यामुळे या जागावाटपाच्या तिढ्यात नेमकं कोण माघार घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *