Headlines

विभागीय आयुक्तांनी छत्रपती संभाजीनगरमधील मतदार यादी कामाचा घेतला आढावा:अचूक व त्रुटीमुक्त यादीसाठी कालमर्यादेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश




छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी आज भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील मतदार यादी कामाचा सविस्तर आढावा घेतला. मतदार यादी अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी प्रत्येक टप्प्यातील काम निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसेच, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या कामाचे नियमित परीक्षण करून प्रगतीवर लक्ष ठेवण्यासही सांगितले. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, अतिरिक्त आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी रणजीत पाटील, सह आयुक्त (सामान्य प्रशासन) मंजुषा मिसकर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी सविता चौधर, तहसीलदार के. के. भदाने यांच्यासह सर्व संबंधित मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते. बैठकीत बीएलओंच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. घरोघरी जाऊन मतदारांची माहिती पडताळणे, गणना फॉर्म अचूक भरणे, कागदपत्रांची तपासणी करणे, प्राप्त अर्जांची वेळेत छाननी करणे आणि प्रलंबित बाबी तातडीने निकाली काढणे यावर भर देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. कोणताही पात्र मतदार यादीतून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यासही त्यांनी सांगितले. जी. श्रीकांत यांनी सांगितले की, विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम मतदार यादी अधिक विश्वासार्ह, पारदर्शक आणि सर्वसमावेशक करण्यासाठी महत्त्वाचा आहे. प्रत्येक अधिकाऱ्याने जबाबदारीने काम करावे. अपात्र नोंदी नियमानुसार व वेळेत वगळाव्यात, तर पात्र मतदारांची नावे अचूकपणे समाविष्ट करण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे. कामात कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी प्रभावी समन्वय राखण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. बैठकीत विधानसभा मतदारसंघनिहाय कामाचाही आढावा घेण्यात आला. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, निवडणूक शाखा, तहसील प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करून निर्धारित वेळापत्रकानुसार सर्व उद्दिष्टे पूर्ण करावीत, तसेच प्रलंबित कामांचा तातडीने निपटारा करावा, असे निर्देश देण्यात आले. मतदार यादी अधिक अचूक आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी नागरिकांनीही मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सादरीकरणाद्वारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाच्या प्रगतीची माहिती दिली. यावेळी एसआयआर संबंधित कामकाज पाहणारे अधिकारी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *