Headlines

600 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी:निरोगी जीवनशैली, संतुलित आहार यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन




छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात ६०० हून अधिक नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. सर्वसामान्य नागरिकांना एकाच छताखाली आरोग्य तपासणी आणि आयुष्मान कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ३५० हून अधिक नागरिकांनी थेट आरोग्य तपासणी करून घेतली, तर २५० हून अधिक नागरिकांची रक्त तपासणी करण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदाब, मधुमेह, नेत्र तपासणी, क्ष-किरण, दंत तपासणी आणि सर्वसाधारण आरोग्य तपासणी यासह १० प्रकारच्या मोफत तपासण्या उपलब्ध होत्या. शिबिराच्या ठिकाणीच पात्र नागरिकांना ‘आयुष्मान भारत कार्ड’ नोंदणीची विशेष सुविधा पुरवण्यात आली. तपासणीनंतर गरजूंना पुढील उपचारांसाठी आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शनही करण्यात आले. तसेच, निरोगी जीवनशैली, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि वेळोवेळी आरोग्य तपासणीचे महत्त्व तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांना समजावून सांगितले. या आरोग्य शिबिराचे आयोजन सभापती अनिल मकरिये यांनी केले होते. शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे आणि महापौर समीर राजूरकर यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित ‘देवाभाऊ कृतज्ञता सेवा सप्ताहा’अंतर्गत हे शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या आयोजनामागील मुख्य उद्देश स्पष्ट करताना स्थायी समिती मनपाचे सभापती अनिल मकरिये म्हणाले, ‘समाजातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा सहज उपलब्ध व्हावी, आरोग्याविषयी जनजागृती व्हावी आणि शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा.’ भविष्यातही अशाच समाजोपयोगी उपक्रमांचे सातत्याने आयोजन केले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *