Headlines

राष्ट्रवादी शिष्टमंडळाची पोलीस आयुक्तांशी भेट:पुणे शहरातील गुन्हेगारी, वाहतूक प्रश्नांवर सविस्तर चर्चा




पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी, कायदा व सुव्यवस्था आणि वाहतुकीच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. सुमारे ६५ मिनिटे चाललेल्या या बैठकीत शहरातील सुरक्षाव्यवस्था, पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाया आणि वाहतूक नियोजनासह विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी सध्या राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती शिष्टमंडळाला दिली. शिष्टमंडळाने काही बाबतीत समाधान व्यक्त केले, तसेच पक्षाकडून पोलिसांना विधायक सूचना दिल्या जातील आणि त्यांची दखल घ्यावी, अशी विनंती केली. आयुक्तांनी या सूचनांचा सकारात्मक विचार करण्याचे मान्य केले. लोकप्रतिनिधी, सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांशी पोलिसांनी नियमित संवाद राखणे आवश्यक असल्याच्या मुद्द्यावर दोन्ही बाजूंचे एकमत झाले. यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू करण्याची तयारी आयुक्तांनी दर्शविली. पोलीस चौकीनिहाय असलेल्या व्हॉट्सॲप गटांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा समावेश करावा, अशी मागणीही शिष्टमंडळाने केली, जी आयुक्तांनी मान्य केली. पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमधील समन्वय वाढवून शहरातील प्रश्नांवर संयुक्तपणे मार्ग काढण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. या बैठकीनंतर पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी, “बैठक सकारात्मक झाली. पूर्ण समाधान झाले नसले तरी बऱ्यापैकी समाधान आहे,” अशी प्रतिक्रिया दिली. शिष्टमंडळात माजी खासदार वंदना चव्हाण, शहराध्यक्ष श्रीकांत पाटील, महापालिका गटनेते काका चव्हाण आणि प्रदेश युवती अध्यक्ष मनाली भिलारे यांचा समावेश होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *