.

नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गासाठी माळशिरस तालुक्यातील निमगाव परिसरातील बाधित जमिनींच्या जीपीसी मोजणीस शुक्रवारी शेतकऱ्यांनी जोरदार विरोध दर्शवत प्रशासनाचा डाव उधळून लावला. सकाळी ६ ते ११ वाजेदरम्यान सुरू असलेल्या या वादग्रस्त प्रक्रियेदरम्यान अनेक शेतकऱ्यांनी पोलीस व महसूल अधिकाऱ्यांसमोरच आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. अखेर शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे प्रशासनाला मोजणी प्रक्रिया स्थगित करावी लागली.
नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाचा मार्ग निमगाव हद्दीतून जाणार असल्याचे स्पष्ट झाल्यापासून, म्हणजेच गेल्या १५ एप्रिलपासून गावातील संभाव्य बाधित शेतकरी या प्रकल्पाला सातत्याने विरोध करत आहेत. या पार्श्वभूमीवर महसूल विभाग आणि महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने ४ व ५ जून रोजी जीपीसी मोजणीचे नियोजन केले होते. मोजणी प्रक्रियेला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून माढा पोलिसांनी ४ जून रोजी महामार्ग विरोधी समितीचे पदाधिकारी के. के. पाटील तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांना ताब्यात घेतले होते. मात्र प्रशासनाच्या या कारवाईचा उलट परिणाम होऊन बाधित शेतकरी आणि संपूर्ण गावकरी अधिक एकजुटीने आंदोलनात सहभागी झाले.
या निषेधार्थ निमगावमध्ये गावबंद पाळण्यात आला. वाढता विरोध लक्षात घेऊन सायंकाळी ६ वाजता दोन्ही नेत्यांची सुटका करण्यात आली. पुढील आंदोलनाच्या नियोजनासाठी शुक्रवारी सकाळी ९ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, त्यापूर्वीच सकाळी सहा वाजता उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार सुरेश शेजूळ यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी आणि मोठा पोलीस बंदोबस्त निमगावमध्ये दाखल झाला. आंदोलनाचा गांधीगिरीचा मार्ग अवलंबत अधिकाऱ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. मात्र मोजणीला तीव्र विरोध कायम ठेवला. शेळके वस्ती आणि नागणे मळा परिसरात मोजणीदरम्यान सर्वाधिक तणाव निर्माण झाला. सुरुवातीला शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी व व्यथा मांडत मोजणी थांबविण्याची विनंती केली. मात्र अधिकाऱ्यांनी मोजणीसाठी यंत्रसामग्री उभारण्यास सुरुवात करताच आम्हाला आत्मदहन करण्याची परवानगी द्या, नाहीतर तुम्ही गोळ्या घाला, जमीन जाणार असेल तर दुसरा पर्यायच नाही असे म्हणत शेतकरी अंगावर पेट्रोल ओतून घेत होते. त्यांना रोखताना काही अधिकाऱ्यांच्या अंगावरही पेट्रोल सांडले. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून संबंधितांना आत्मदहनापासून परावृत्त केले आणि मोठा अनर्थ टळला. गौतम जगन्नाथ मगर हे ७२ वर्षांचे शेतकरी गेली ४ दिवसांपासून बेपत्ता आहेत त्यांचा कुठेच पत्ता लागत नाही, तर विजय लक्ष्मण मगर यांनी विषारी औषध घेऊन जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला होता, उपचारानंतर आता ते ठीक आहेत. मोजणी पथक आले असून त्यांनी प्रक्रिया सुरू केल्याचे समजताच शेकडो लोकांनी पिलीव रोडवरील शेळके वस्तीकडे धाव घेतली. त्यामुळे त्याठिकाणी जत्रेचे स्वरूप आले होते. रस्ता बंद झाल्याने वाहतूक लोकांना वळवावी लागली. सकाळी १० च्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे याठिकाणी येत असल्याची अफवा होती. दरम्यान बाधित शेतकऱ्यांचा विरोध सुरूच होता, ते मशीनही बाहेर काढू द्यायला तयार नव्हते. या पार्श्वभूमीवर ही मोजणी प्रक्रिया थांबविण्याचा निर्णय घेत ११ च्या सुमारास प्रशासनाचे सर्व अधिकारी रिकाम्या हाताने परत गेले. व त्यानंतरच निमगावधील सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले.
आमदार रोहित पवार येत असल्याची अफवा
विषारी औषध घेऊन जीवन संपवण्याचा केला प्रयत्न ^जमीन जाण्याच्या भीतीने एक निघून गेला तर एकाने विषारी औषध घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. लोकच राहणार नसतील तर सरकार या रस्त्याचा उपयोग कुणासाठी करणार आहे – डॉ सचिन मगर, बाधित शेतकरी
महिलांचा अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न