![]()
शक्तीपीठ महामार्गासाठी सांगली जिल्ह्यात पोलीस बळाचा वापर करून सुरू असलेल्या ड्रोन मोजणीविरोधात शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. या दडपशाहीच्या निषेधार्थ आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विटा तहसील कार्यालयावर ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. मोर्चेकरांनी थेट तहसील कार्यालयात प्रवेश करत ठिय्या आंदोलन मांडले. “दिवसभर काबाडकष्ट करून झोपलेल्या शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता पहाटे दोन वाजता जमिनीचे सर्वेक्षण का करताय?” असा संतप्त सवाल राजू शेट्टी यांनी प्रांताधिकाऱ्यांना जाहीरपणे विचारला. विटाजवळील भाग्यनगर आणि नागेवाडीसह अनेक गावांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पोलीस बंदोबस्तात शक्तीपीठ महामार्गाचे ड्रोन सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे. मात्र, स्थानिक शेतकऱ्यांनी या मोजणीला तीव्र विरोध केला आहे. काल ड्रोन मोजणी रोखल्यानंतर, आज पुन्हा पहाटे दोन-तीन वाजल्यापासून नागेवाडी भागात पोलीस तैनात करून मोजणीचा प्रयत्न झाला. या दरम्यान अनेक ठिकाणी पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये जोरदार झटापट झाली. शेतकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासनाला सर्वेक्षण थांबवावे लागले. ‘जनरल डायरच्या औलादी’; राजू शेट्टींचा पोलिसांवर हल्लाबोल या संदर्भात राजू शेट्टी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारवर कडाडून टीका केली. शेट्टी म्हणाले, “सांगलीचे जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोषी यांच्या बुडाखाली अमली पदार्थांची राजरोस विक्री होत आहे. सांगली आणि मिरज शहर ड्रग्जचे हब बनले असून, हप्तेखोरीमुळे लाखो कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. या खऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची हिंमत खाकी वर्दीत नाही; मात्र जनरल डायरच्या या औलादी शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्या आहेत.” मुख्यमंत्री फडणवीस यांनी इतिहास लक्षात ठेवावा! पुढे बोलताना शेट्टी यांनी थेट मुख्यमंत्र्यांना इशारा दिला. “सांगली हा क्रांतीसिंह नाना पाटील, क्रांतिवीर नागनाथ नायकवडी आणि क्रांतीअग्रणी जी. डी. लाड यांच्या संघर्षाचा, क्रांतीचा जिल्हा आहे, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात ठेवावे. पोलिसांनी कितीही बळजबरी केली, तरी शेतकरी हा मोजणीचा प्रयत्न हाणून पाडतील,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. प्रशासनाकडून निवेदन स्वीकारत आंदोलनाची सांगता तहसील कार्यालयातील प्रदीर्घ ठिय्या आंदोलनानंतर प्रांताधिकारी विक्रम सिंह बादल, उपविभागीय अधिकारी विपुल पाटील आणि तहसीलदार योगेश टोणपे यांनी मोर्चेकरी शेतकऱ्यांच्या भावना ऐकून घेतल्या आणि त्यांचे मागणीचे निवेदन स्वीकारले. मात्र, शक्तीपीठ महामार्गावरून सांगलीतील वातावरण सध्या कमालीचे तापले आहे. हे ही वाचा… शक्तिपीठ महामार्ग:का होतोय शेतकऱ्यांचा एवढा विरोध? सर्वात महत्त्वाचा रस्ते प्रकल्प संघर्षाचा केंद्रबिंदू कसा बनला, जाणून घ्या! कोल्हापूरपासून ते थेट मराठवाड्यापर्यंत गेल्या काही महिन्यांत हा नारा सातत्याने घुमत आहे. एका बाजूला राज्य सरकार हा प्रकल्प महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी अत्यावश्यक असल्याचे ठासून सांगत आहे, तर दुसऱ्या बाजूला हजारो शेतकरी, ग्रामस्थ आणि स्थानिक संघटना रस्त्यावर उतरून याला कडवा विरोध करत आहेत. सविस्तर वाचा…
Source link
शक्तीपीठ विरोधात विटा तहसीलवर शेतकऱ्यांचा मोर्चा:पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा सवाल; पोलिसांवर गंभीर आरोप