Headlines

शबरी नॅचरल्सच्या शिरपेचात मानाचा तुरा:पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 'मन की बात'मध्ये गौरव; पॅकेजिंगला आंतरराष्ट्रीय 'गुड डिझाईन' पुरस्कार




शबरी नॅचरल्सचे पॅकेजिंग फक्त पॅकेजिंग नसून त्यावर आदिवासी संस्कृतीची छाप दिसून येते. या पॅकेजिंगला आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुड डिझाईन पुरस्कार देखील जाहीर झाला असून या माध्यमातून आदिवासी संस्कृती जागतिक व्यासपीठावर पोहचली आहे, असे गौरवोद्गार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. मन की बात च्या 139 व्या भागामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शबरी नॅचरल्सचा उल्लेख केला आहे. स्थानिक पातळीवर सुरू झालेल्या आणि नैसर्गिक उत्पादनांच्या माध्यमातून देशभरात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या ‘शबरी नॅचरल्स’ या उपक्रमाची आता थेट राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या लोकप्रिय ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमात शबरी नॅचरल्सच्या नाविन्यपूर्ण कार्याचे, आदिवासी संस्कृती जोपासण्याचे आणि आदिवासी बांधवांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ करुन देण्याचे भरभरून कौतुक केले आहे. पंतप्रधानांच्या ‘व्होकल फॉर लोकल’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनांना केवळ कागदावर न ठेवता प्रत्यक्ष कृतीत उतरवत, महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत शबरी कॉर्पोरेशनच्या माध्यमातून या ब्रँडची अत्यंत यशस्वी उभारणी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गौरवोद्गार देशवासियांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदींनी शबरी नॅचरल्सच्या प्रेरणादायी प्रवासाचा विशेष उल्लेख केला. कोणत्याही उत्पादनांचा त्याचे पॅकेजींग खऱ्या अर्थाने ओळख देत असते. शबरी नॅचरल्सने बनविलेले पॅकेजिंग हे फक्त पॅकेजिंग नसून त्यामाध्यमातून आदिवासी संस्कृतीचे जतन केले आहे. याच पॅकेजिंगला जगातील सर्वात महत्वाचा समजला जाणारा गुड डिझाईन पुरस्कार देखील जाहीर झाला आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण झाली आहे. शबरी नॅचरल्सने अनेक पाड्यांवरील आदिवासी कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या सक्षमही केले आहे. तळागाळातील आदिवासी बांधवांना सोबत घेऊन चालणारे शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ देशाच्या शाश्वत विकासात मोलाचे योगदान देत आहेत, असे गौरवोद्गार या कार्यक्रमात काढण्यात आले. जगभरातील ग्राहकांना एका क्लिकवर शबरी नॅचरल्सची उत्पादने उपलब्ध शबरी नॅचरल्सने काळाची पावले ओळखून आपल्या अस्सल आणि नैसर्गिक उत्पादनांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. महाराष्ट्राच्या दुर्गम भागातील आदिवासी बांधवांनी तयार केलेली ही उत्पादने आता केवळ स्थानिक बाजारापुरती मर्यादित राहिलेली नाहीत. ग्राहकांना ही उत्पादने घरबसल्या आणि अत्यंत सुलभतेने खरेदी करता यावीत, यासाठी शबरी नॅचरल्सने अत्यंत प्रगत असे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि स्वतंत्र मोबाईल एप्लिकेशन विकसित केले आहे. या डिजिटल माध्यमांमुळे देशभरातील आणि जगभरातील ग्राहकांना आता एका क्लिकवर शबरी नॅचरल्सची उत्पादने उपलब्ध झाली आहेत. यामुळे आदिवासी बांधवांच्या उत्पन्नात आणि राहणीमानात मोठी वाढ होत आहे. बचत गटांना वर्षभर शाश्वत स्वरूपाचा रोजगार मिळाला डिजिटल विस्तारासोबतच शबरी नॅचरल्सने कॉर्पोरेट गिफ्टींगच्या क्षेत्रातही आपले भक्कम पाऊल ठेवले आहे. आजकाल विविध सण, उत्सव, दिवाळी, नववर्ष तसेच कॉर्पोरेट क्षेत्रातील विशेष कार्यक्रमांमध्ये भेटवस्तू देण्यासाठी शबरी नॅचरल्सच्या नैसर्गिक आणि आकर्षक उत्पादनांना मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत आहे. बांबूची उत्पादने, सेंद्रिय कृषी उत्पादने आणि मोहापासून तयार झालेल्या वस्तूंचे खास ‘गिफ्ट हॅम्पर्स’ तयार करण्यात आले आहेत. कॉर्पोरेट क्षेत्राकडून मिळणाऱ्या या मोठ्या मागणीमुळे (Bulk Orders) आदिवासी कारागीर, शेतकरी आणि महिला बचत गटांना वर्षभर शाश्वत स्वरूपाचा रोजगार उपलब्ध होत आहे आणि त्यांच्या उत्पादनांना हक्काची मोठी आणि हक्काची बाजारपेठ मिळाली आहे. पॅकेजिंगमध्ये वारली, गोंड आणि चित्रकथींचा सुरेख मिलाफ शबरी नॅचरल्सच्या उत्पादनांचे एक अद्वितीय वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे कल्पक पॅकेजिंग. या पॅकेजिंगमध्ये वारली, गोंड आणि चित्रकथी यांसारख्या महाराष्ट्रातील समृद्ध आदिवासी कला परंपरा आणि लोककथांचा सुरेख मिलाफ साधण्यात आला आहे. यामुळे प्रत्येक उत्पादनाचे पॅकेजिंग हे केवळ आकर्षक वेष्टन न राहता, आदिवासी संस्कृतीचा परिचय करून देणारे एक कथाकथनाचे (Storyteller) प्रभावी माध्यम बनले आहे. मोहापासून तयार होणारी उत्पादने, स्थानिक कृषी उत्पादने आणि बांबू हस्तकला यांच्या माध्यमातून पारंपारिक ज्ञान आणि कौशल्य यांची आधुनिक बाजारपेठेशी अत्यंत यशस्वी सांगड घातली जात आहे. याच वैशिष्ट्यपूर्ण आणि कल्पक पॅकेजिंगला ‘इंडिया डिझाईन मार्क’ आणि नुकताच जपानचा अत्यंत प्रतिष्ठित असा ‘गुड डिझाईन अवॉर्ड’ हे जागतिक स्तरावरील मानाचे सन्मान प्राप्त झालेले आहेत. आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके काय म्हणाले? आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक वुईके यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, माननीय पंतप्रधानांनी ‘मन की बात’ मध्ये केलेल्या या विशेष गौरवामुळे शबरी नॅचरल्सच्या माध्यमातून सुरू असलेल्या आदिवासी बांधवांच्या विकासाला मोठे राष्ट्रीय बळ मिळाले आहे. शबरी नॅचरल्स हा केवळ एक ब्रँड नसून, ती महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या परंपरेची आणि स्वतःच्या आवाजातून जगासमोर मांडलेली यशोगाथा आहे. याची राष्ट्रीय पातळीवर घेतली गेलेली दखल यामुळे आगामी काळात डिजिटल प्लॅटफॉर्म आणि कॉर्पोरेट गिफ्टींगच्या माध्यमातून ग्रामीण उद्योजकतेला एक नवी आणि जागतिक दिशा प्राप्त होईल. आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांची प्रतिक्रिया आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त श्रीमती लीना बनसोडे म्हणाल्या की, आदिवासी संस्कृती ही अतिशय समृद्ध अशी संस्कृती आहे. आदिवासी बांधवांच्या परंपरा, कलाकृती यांना समाजात अनन्यसाधारण महत्व आहे. शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळातर्फे शबरी नॅचरल्स ब्रँड विकसित केला गेला त्याचा मुळ गाभाच ही समृद्ध संस्कृती पुढे जायला हवी तसेच आदिवासी बांधवांचे प्रिमियम उत्पादने यांना जागतिक बाजारपेठ मिळायला हवी, हा आहे. आज देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सरांनी शबरी नॅचरल्सचा उल्लेख केला ही अभिमानाची बाब आहे. सर्वांना आवाहन आहे की, सर्वांनी मिळून ही संस्कृती साजरी करुया.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *