![]()
शहरातील अंतर्गत तसेच मुख्य चौकातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून अकोट खड्डेमय झाले आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसने खड्ड्यात बसून आंदोलन केले होते. निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. नागरिकांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. सर्वाधिक समस्या प्रमुख चौकांमध्ये असते. या ठिकाणी वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे येथे मोठी दुर्घटना घडण्याची भीतीही व्यक्त होत आहे. महिन्यात श्रावण महिन्याला सुरुवात होणार असून विदर्भात प्रसिद्ध असलेली श्री क्षेत्र धारगड यात्रा, त्यानंतर चौथ्या सोमवारला निघणारी कावड यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या धार्मिक सोहळ्यांदरम्यान हजारो भाविकांची तसेच वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. त्यामुळे उत्सवांपूर्वी शहरातील रस्त्यांची तातडीने डागडुजी करणे अत्यावश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस भूमिका किंवा दिलासा मिळालेला नाही. यातील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे शहरातील रस्त्यांची जबाबदारी असलेल्या नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच मोठे खड्डे पडले आहेत. शहरात प्रवेश करणाऱ्या नागरिकांचे जणू खड्ड्यांतूनच स्वागत होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केलीजात आहे. श्रावणातील धार्मिक यात्रांपूर्वी शहरातील मुख्य, अंतर्गत रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. खड्डे बुजवावेत. भविष्यात दर्जेदार, टिकाऊ रस्त्यांची कामे करण्यात यावीत. अशी मागणी अकोटकरांनी प्रशासन, लोकप्रतिनिधींकडे केली आहे. शहरातील राजकीय परिस्थितीवरही नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी “अकोट शहर मंच’ या नावाने आघाडी तयार करण्यात आली होती. या आघाडीत विविध पक्षांतील काही नेत्यांनी सहभाग घेतला. मात्र सत्तास्थापनेनंतर नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर कोणताही प्रभावी आवाज उठताना दिसत नसल्याची भावना शहरवासीयांमध्ये आहे. पाऊस ओसरल्यानंतर होणार काम सुरू ^संबंधित विभागाला सूचना दिल्या असून पावसाचा जोर उतरताच शहरातील अंतर्गत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात होईल. नागरिकांना त्रास होणार नाही. याबाबत आम्ही पूर्ण काळजी घेऊ. – माया धुळे, नगराध्यक्ष न.प अकोट नवनियुक्त सदस्यांचाही होतो खड्ड्यातून प्रवास अलीकडेच पालिकेत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनाही खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. जनप्रतिनिधींना तरीदेखील शहरातील खड्डे त्यांच्या नजरेस पडत नाहीत का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शहरामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी सर्वाधिक खड्डे अकोट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, सोनू सेठ चौक, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, बस स्थानक रोड, मच्छी सात परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या मार्गांवरून दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी, व्यापारी, शासकीय कर्मचारी प्रवास करतात. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचत असल्याने त्यांची खोली लक्षात येत नाही. त्यामुळे दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना घडण्याची शक्यता वाढली आहे. अंतर्गत रस्त्याची परिस्थिती गंभीर ^शहरातील समस्येबाबत काँग्रेस सतत आवाज उठवत आहे. काही दिवस मलमपट्टी केली जाते. पुन्हा तेच खड्डे उघडे पडतात. हा प्रकार नवीन नसला तरी यावर्षी परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होतो. काही महिन्यांतच रस्ते पुन्हा उखडतात. निकृष्ट काम करणाऱ्यांवर कारवाई का होत नाही. – सारंग मालाणी, अकोट शहराध्यक्ष, काँग्रेस.
Source link
शहर खड्डेमय:अकोटमधील अंतर्गत रस्ते बनले मृत्यूचे सापळे; रस्त्यांची चाळण, पावसानंतर सरकारी यंत्रणांचा बेताल कारभार चव्हाट्यावर