![]()
दिल्लीतील जंतरमंतरवर पेपरफुटीच्या विरोधात झालेल्या देशव्यापी आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्या आंदोलनात तरुणाईचे नेतृत्व करणारे सामाजिक कार्यकर्ते अभिजित दिपके यांनी आता देशातील आणि राज्यातील सरकारी शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी ‘स्कूल ठीक करो’ मोहीम हाती घेतली आहे. 15 ऑगस्ट रोजी हिंगोलीतून सुरू झालेली ही मोहीम जेव्हा लातूर जिल्ह्यातील औसा शहरात पोहोचली, तेव्हा तिथे जे घडले त्याने संपूर्ण शिक्षण क्षेत्र हादरले आहे. औसा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेची पाहणी करण्यासाठी जेव्हा अभिजित दिपके आपल्या सहकाऱ्यांसह पोहोचले, तेव्हा त्यांना वर्गात विद्यार्थी बसलेले दिसले. मात्र, जेव्हा या विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यात आला, तेव्हा सत्य ऐकून तपासणी करणाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. वर्गात बसलेली मुले जिल्हा परिषद शाळेची नसून, ती शहरातील ‘पीपल्स प्रायमरी स्कूल’ या खासगी शाळेतील होती! विद्यार्थ्यांची थेट कॅमेऱ्यासमोर कबुली सरकारी शाळेची पटसंख्या (विद्यार्थी संख्या) कागदावर फुगवून दाखवण्यासाठी की शाळा ‘ऑल इज वेल’ असल्याचा आव आणण्यासाठी हा बनाव रचला गेला? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे, तपासणी दरम्यान विद्यार्थ्यांनी स्वतः आपण खासगी शाळेचे असून आपल्याला इथे आणून बसवल्याची कबुली दिली. या धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. राज्यातील जिल्हा परिषद शाळांची आणि तिथल्या व्यवस्थेची नक्की काय दुरवस्था झाली आहे, याचे जिवंत उदाहरणच या निमित्ताने समोर आले आहे. अधिकाऱ्यांची पळवाट; आंदोलनाचा इशारा हा संपूर्ण बोगसगिरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर शाळेतील कोणत्याही जबाबदार शिक्षकाने किंवा अधिकाऱ्याने यावर स्पष्टीकरण देण्याचे टाळले. त्यामुळे संतप्त झालेल्या अभिजित दिपके यांनी आपला मोर्चा थेट औसा पंचायत समितीच्या बीडीओ (BDO) कार्यालयाकडे वळवला. मात्र, तिथेही मुख्य अधिकारी गैरहजर असल्याचे आढळून आले. आजी-माजी लोकप्रतिनिधींवर प्रश्नचिन्ह औसा विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व भाजपचे नेते आमदार अभिमन्यू पवार करत आहेत. मतदारसंघात शिक्षण व्यवस्थेच्या नावाखाली असा ढिसाळपणा आणि फसवणूक सुरू असल्यामुळे आता आमदार पवार या प्रकरणाची गंभीर दखल घेणार का, की या बोगसगिरीकडे कानाडोळा करणार, याकडे लातूर जिल्ह्यातील पालकांचे आणि जनतेचे लक्ष लागले आहे. फसवणुकीचा मार्ग का अवलंबत आहे? लातूरच्या औसा तालुक्यातील एका सरकारी शाळेने बाहेरच्या मुलांना आणून त्यांना प्रसारमाध्यमांसमोर आपल्याच शाळेतील विद्यार्थी म्हणून सादर करण्यात आले. शाळांमध्ये प्रत्यक्ष सुधारणा करण्याऐवजी प्रशासन फसवणुकीचा मार्ग का अवलंबत आहे?, असा सवाल अभिजित दिपके यांनी सोशल मीडियावर केला आहे. सरकारी शाळांमधील ही फसवणूक खपवून घेतली जाणार नाही. येत्या एका आठवड्याच्या आत औसा येथील गैरहजर बीडीओ आणि संबंधित जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कडक प्रशासकीय कारवाई झाली पाहिजे. तसे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल.
— अभिजित दिपके, संस्थापक, कॉकरोच जनता पार्टी
Source link
शिक्षण व्यवस्थेचा 'लातूर पॅटर्न'?:अभिजित दिपके यांच्या 'स्कूल ठीक करो' मोहिमेत ZP शाळेत अवतरले खासगी शाळेचे विद्यार्थी, औसा येथे बोगसगिरी उघड