![]()
राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 अंतर्गत कर्जमाफीची पहिली यादी आज (22 जुलै) दुपारी 3 वाजता जाहीर केली जाणार असल्याची घोषणा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केली आहे. मंत्रालयात होणाऱ्या पत्रकार परिषदेत पहिल्या टप्प्यातील लाभार्थींची यादी जाहीर केली जाणार असून, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यासही आजपासून सुरुवात होणार आहे. आज दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ही घोषणा करण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. दुपारी 3 वाजता मंत्रालयात पत्रकार परिषद मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की, दुपारी 3 वाजता मंत्रालयात पत्रकार परिषद घेऊन कर्जमाफीच्या पहिल्या यादीची अधिकृत घोषणा केली जाईल. याच वेळी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची प्रक्रियाही सुरू होणार आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची कर्जखाती ‘निरंक’ होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यापूर्वी काल पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रीही म्हणाले होते की, शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून 22 जुलै रोजी प्राथमिक लाभार्थी यादी जाहीर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सहकार विभागाने यासाठी आवश्यक तयारी केली असून, अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधत ही यादी प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दोनदा पुढे ढकलल्यानंतर अखेर निर्णय राज्य सरकारने यापूर्वी 30 जूनपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर 5 जुलैचा मुहूर्तही चर्चेत होता. मात्र, पात्रतेचे निकष, आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना वगळण्याचा निर्णय आणि आर्थिक तरतुदीमुळे घोषणा पुढे ढकलण्यात आली. पावसाळी अधिवेशनात कर्जमाफीसाठी सुमारे 20 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्यानंतर प्रक्रियेला वेग आला. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही यापूर्वी कर्जमाफीच्या निकषांमध्ये काही बदल करण्यात आल्याचे सांगितले होते. अर्ज करण्याची गरज नाही या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांना स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नाही. शासनाकडे उपलब्ध असलेल्या नोंदींच्या आधारे लाभार्थी निश्चित केले जाणार आहेत. कर्जमाफीची यादी संबंधित बँका आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध केली जाणार असून, त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून लाभ देण्यात येणार आहे. कर्जमाफीमुळे पात्र शेतकऱ्यांची कर्जखाती नियमित होणार असून, आगामी पीक हंगामासाठी नवीन पीक कर्ज मिळण्याचा मार्गही मोकळा होणार आहे.
Source link
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी!:आज दुपारी 3 वाजता कर्जमाफीची पहिली यादी जाहीर होणार; आजपासूनच खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात