![]()
अंतापूर (ता. सटाणा) येथे सद्गुरूंच्या नामस्मरणाने दुमदुमलेला आसमंत, टाळ-मृदंगाचा गजर आणि ‘जय शंकर बाबा’चा जयघोष.. अशा मंगलमय वातावरणात मंगळवारी श्री सद्गुरू शंकर महाराजांचा प्रकटदिन सोहळा उत्साहात पार पडला. महाराजांची जन्मभूमी व ध्यानसाधनेचे जागृत केंद्र असलेल्या अंतापूर येथील ‘मोठ्या वडाची बाग’ परिसरातील ॐ नमो सद्गुरू शंकरनाथ महाराज मठात या सोहळ्यानिमित्त श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह परराज्यांतून हजारो भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावल्याने संपूर्ण तीर्थक्षेत्राला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. प्रकटदिन सोहळ्याचा प्रारंभ पहाटे श्रींच्या अभ्यंगस्नानाने झाला. त्यानंतर वेदघोषात महाअभिषेक, महापूजा, ध्वजारोहण आणि होमहवनाचे विधी पार पडले. मठात सुरू असलेल्या ‘श्री शंकर महाराज भक्ती विजय’ ग्रंथ पारायण झाले. दुपारी महाआरती झाल्यानंतर हजारो भाविकांनी श्रींच्या चरणी नतमस्तक होत दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाईने उजळून निघालेल्या मठ परिसरातून दुपारी चार वाजता सोहळ्याची पालखी मिरवणूक काढण्यात आली. भजनांचे सूर, टाळ-मृदंगाचा ताल आणि भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे मिरवणूक मार्गावर भक्तीचा महापूर लोटला होता. पालखीचे दर्शन घेण्यासाठी ग्रामस्थ व भाविकांनी दुतर्फा मोठी गर्दी केली होती. सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी व धार्मिक विधि-सोहळ्यामध्ये ट्रस्टचे संचालक शिवबा जाधव, गुलाबनाथ महाराज, कृष्णा जाधव, मधुकर जाधव, संजय जाधव, साहेबराव गवळी आणि डॉ. हंसराज क्षीरसागर यांच्यासह मठाचे सेवेकरी, श्री शंकर महाराज सेवा समिती मंडळ, स्वयंसेवक आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.
Source link
श्रद्धा व भक्तीचा संगम:अंतापूरला सद्गुरू शंकर महाराजांच्या प्रकटदिन सोहळ्यानिमित्त पालखी