Headlines

श्रीकृष्ण मंदिरात उद्यापासून मानसशास्त्रीबाबांचे प्रवचन:पुरुषोत्तम मासनिमित्त श्री कृष्ण कथा सोहळ्याचे आयोजन




अमरावती येथील द्वारकाधीश श्रीकृष्ण मंदिर, माताखिडकी-बुधवारा येथे महानुभाव वासानिक सेवा मंडळाच्या वतीने पुरुषोत्तम मासनिमित्त (अधिकमास) श्री कृष्ण कथा प्रवचन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा सोमवार, १८ मे रोजी सुरू होणार असून, तो २४ मेपर्यंत सलग चालणार आहे. श्री कृष्ण कथेचे निरूपण दररोज सायंकाळी ६ ते ८.३० वाजेपर्यंत होईल. सिन्नर (जि. नाशिक) येथील कृष्णकथाव्यास म. श्री. मानसशास्त्री बाबा महानुभाव यांच्या सुमधुर वाणीतून संगीतमय श्री कृष्ण कथा निरूपण करण्यात येणार आहे. प. पू. बाबांची संपूर्ण भारतात अनेक ठिकाणी सतत प्रवचने व संगीतमय श्री कृष्ण कथा कार्यक्रम होत असतात. या प्रवचन सोहळ्याचे उद्घाटन सोमवारी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. यावेळी श्री कृष्ण मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष पावडे, उपाध्यक्ष डॉ. अशोक राऊत, सचिव ॲड अरुण ठाकरे, कोषाध्यक्ष इंजि. एस. पी. देशमुख आणि मंडळाचे अध्यक्ष बाबुराव बोराळकर यांच्या हस्ते, सर्व सदभक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा सुरू होईल. या कृष्ण कथेमध्ये श्री कृष्ण महात्म्य, कृष्ण स्तुती, श्री कृष्ण जन्म सोहळा, बाललीळा, गोपी गीत, कंसचानूर मर्दनम, द्वारका गमन, श्री कृष्ण रुख्मिणी विवाह सोहळा, कृष्ण तुला, महाभारत प्रसंग, सुदामा भेट आणि श्रीमदभगवतगीता निरूपण असे अनेक प्रसंग प्रस्तुत केले जातील. या सोहळ्याचा समारोपीय कार्यक्रम रविवार, २४ मे रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष प. पू. प. म. आचार्यप्रवर श्री कारंजेकर बाबा राहतील. अमरावती महानुभाव वासानिक सेवा मंडळ तसेच श्रीकृष्ण मंदिर देवस्थान ट्रस्टने सर्व सद्भक्तांना वेळेवर उपस्थित राहून, संगीतमय श्री कृष्ण कथा प्रवचनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *