![]()
श्रीगोंदे तालुक्यात विहिरींचे खोदकाम, शेततळे आणि दगडखाणींसाठी मोठ्या प्रमाणावर लागणाऱ्या जिलेटिन आणि डिटोनेटर सारख्या घातक स्फोटक साहित्याचा काळाबाजार उघडपणे सुरू आहे. या प्रकाराकडे महसूल आणि पोलिस यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने, स्थानिक नागरिकांमधून तीव्र संशय आणि संताप व्यक्त केला जात आहे. काही महिन्यांपूर्वी श्रीगोंदे तालुक्यातील टाकळी कडेवळीत गावात विहिरीचे खोदकाम सुरू असताना जिलेटिनच्या कांड्यांचा भीषण स्फोट झाला होता. या दुर्घटनेत तीन निष्पाप कामगारांचा जागीच मृत्यू झाला होता, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले होते. एवढी मोठी जीवघेणी दुर्घटना घडूनही प्रशासनाने यातून धडा घेतलेला नाही. तालुक्यात अवैध स्फोटकांचा सुळसुळाट आजही जसाच्या तसा कायम असल्याचे चित्र आहे. विहिरींचे खोदकाम वेगाने उरकण्यासाठी खाजगी कंत्राटदार कोणत्याही सुरक्षा परवानग्या न घेता काळ्या बाजारातून चढ्या दराने जिलेटिन कांड्या खरेदी करत आहेत. पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संस्थोच्या नियमांनुसार, स्फोटके ठेवण्यासाठी आणि वाहून नेण्यासाठी विशेष वाहने व तज्ज्ञ व्यक्तींची आवश्यकता असते. मात्र, तालुक्यात सर्रास दुचाकी किंवा खाजगी चारचाकी गाड्यांमधून या साहित्याची धोकादायक वाहतूक केली जात आहे. टाकळी कडेवळीतच्या दुर्घटनेनंतर पोलिसांनी कंत्राटदारावर गुन्हा दाखल केला, मात्र या स्फोटकांचा मुख्य पुरवठादार कोण? याचे अवैध जाळे कोण चालवते? याचा तपास अद्याप पुढे सरकलेला नाही. श्रीगोंदे तालुक्यातील सर्व विहिरींच्या खोदकामांची आणि दगडखाणींची तातडीने तपासणी व्हावी. अनधिकृतपणे जिलेटिन विकणाऱ्या मुख्य पुरवठादारांवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. अनधिकृतपणे स्फोटकांचा साठा आढळल्यास कारवाई ^ बेलवंडी पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात जर अशा गोष्टी निदर्शनास आल्या, तर संबंधितांकडे अधिकृत लायसन्स आहे का, याची खात्री करून तपासणी केली जाईल. जर कुठेही अनधिकृतपणे स्फोटकांचा वापर किंवा साठा सुरू असल्याचे आढळले, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. – नंदकुमार सोनवलकर, प्रभारी निरीक्षक, बेलवंडी पोलिस स्टेशन.
Source link
श्रीगोंदे तालुक्यात जिलेटिन स्फोटकांचा काळाबाजार:दुचाकी आणि खासगी गाड्यांमधून घातक साहित्याची होतेय धोकादायक पद्धतीने वाहतूक