![]()
श्रीरामपूर एमआयडीसी परिसरात मंजूर झालेले २२० केव्ही वीज उपकेंद्राचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने तालुक्यातील वीजपुरवठ्याचा प्रश्न कायम आहे. सुमारे ४० कोटी ६९ लाख रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे काम एका वर्षात पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, कामाला
.
ग्रामीण भागात सध्या वीजपुरवठा विस्कळीत होत असून, वारंवार वीज गायब होणे आणि कमी दाबाने वीज मिळणे यामुळे शेतकऱ्यांच्या कृषी पंपांवर परिणाम होत आहे. घरगुती उपकरणे खराब होण्याबरोबरच कृषी पंप जळण्याच्या घटनाही घडत आहेत. पाण्याची टंचाई असताना वीजपुरवठ्याचीही अनिश्चितता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. नगर जिल्ह्यात जवळपास प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र वीज उपकेंद्र आहे. मात्र श्रीरामपूर तालुका अद्याप या सुविधेपासून वंचित आहे. सध्या बाभळेश्वर व नेवासा येथून श्रीरामपूरला वीजपुरवठा केला जातो. दोन्ही केंद्रांचे अंतर ३० किलोमीटरपेक्षा अधिक आहे. विशेषतः श्रीरामपूर शहर व बेलापूरला बाभळेश्वर केंद्रावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते. सूतगिरणीपर्यंत एकाच वाहिनीतून वीज आणल्यानंतर तेथून श्रीरामपूर शहर व बेलापूरसाठी स्वतंत्र वाहिन्या आहेत. मात्र ही यंत्रणा जुनी झाल्याने बिघाड झाल्यास दोन-दोन दिवस वीजपुरवठा खंडित राहण्याची वेळ येते. त्याचा फटका उद्योग, व्यापारी तसेच शेतकऱ्यांना बसतो. एमआयडीसीतील २२० केव्ही केंद्र कार्यान्वित झाल्यास वीजपुरवठ्यावरील सध्याचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करून ते लवकर कार्यान्वित करण्याची मागणी होत आहे.
जानेवारीत लोकार्पणाचा दावा
आमदार हेमंत ओगले म्हणाले, २२० केव्ही केंद्राच्या कामाचा आढावा घेतला असून डिसेंबरअखेर काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. जानेवारीत केंद्राचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या केंद्राची क्षमता १०० मेगावॉट आहे. पुढील महिन्यात उल्कलगाव येथे ३० मेगावॉट क्षमतेच्या उपकेंद्राचे काम सुरू होणार असून त्यानंतर भेर्डापूर येथेही ३० मेगावॉट क्षमतेचे उपकेंद्र प्रस्तावित आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर श्रीरामपूर शहर, एमआयडीसी आणि ग्रामीण भागातील वीजपुरवठ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होईल.