![]()
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार काशिनाथ दाते यांनी सोमवारी अधिकाऱ्यांसह तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. वडनेर हवेली व पारनेर परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. निकषानुसार प्रत्येक आपत्तीग्रस्ताला मदत मिळेल, कोणीही वंचित राहणार नाही; मात्र शेतकऱ्यांनी सबुरीने घ्यावे, असे आवाहन दाते यांनी केले. राज्य सरकारने २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करून पंचनाम्याचे निर्देश दिल्यानंतर ही पाहणी करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकासाठी एकरी दहा हजार रुपयांहून अधिक खर्च झाल्याचे सांगितले. दाते म्हणाले, दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने उपाययोजना सुरू केल्या आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणेला आवश्यक सूचना दिल्या आहेत. संपूर्ण मतदारसंघातील शेतकऱ्यांचे पंचनामे केले जातील. प्रक्रियेत एक-दोन दिवसांचा विलंब झाल्यास प्रशासनाच्या मर्यादा समजून घेऊन शेतकऱ्यांनी सहकार्य करावे. दुष्काळामुळे पिकांच्या नुकसानीसोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून, या कठीण काळात नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही दाते यांनी दिली. यावेळी तहसीलदार गायत्री सौंदाणे, तालुका कृषी अधिकारी गजानन घुले,सुभाष दुधाडे, लहू भालेकर,विठ्ठल औटी,शिवाजी औटी,राहुल औटी,दादाभाऊ औटी,स्वप्निल भालेकर, किसन शिंदे, दिगंबर भालेकर,मोहन भालेकर ,सुनील बढे, दादाभाऊ वाळुंज, वसंत बडे,राम साळुंखे उपस्थित होते.
Source link
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर आमदार दाते:मदतीची दिली ग्वाही, पंचनाम्यांना वेग; पिण्याच्या पाण्यासाठीही युद्धपातळीवर प्रयत्न