Headlines

संघाच्या कार्यालयावरील मोर्चा सरकार सहन करणार नाही:काँग्रेसच्या आंदोलनावरून बावनकुळे संतापले, म्हणाले- हिंमत असेल तर भाजप कार्यालयावर मोर्चा काढा




काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याची भूमिका घेतल्यानंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मुद्द्यावरून काँग्रेसवर जोरदार पलटवार केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा राष्ट्र उभारणी आणि देशाच्या अखंडतेसाठी निस्वार्थपणे काम करणारी संघटना आहे. अशा संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढणे सरकार कदापि सहन करणार नाही. जर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये खरोखरच हिंमत असेल, तर त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावर मोर्चा काढून दाखवावा, असे थेट आव्हान मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. सरकारविरोधात आंदोलन करा, संघावर नको! मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना बावनकुळे यांनी काँग्रेसच्या या आंदोलनाच्या रणनीतीवर कडाडून टीका केली. लोकशाहीत विरोधकांना आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे, मात्र तो कुठे करावा याचे भान काँग्रेसने ठेवले पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला. ते म्हणाले की, “जर काँग्रेसला सरकारविरोधात आंदोलन करायचे असेल, तर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय, जिल्ह्यांचे पालकमंत्री कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय किंवा नागपुरातील मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या रामगिरीवर मोर्चे काढावेत. तिथे आंदोलन करण्यास आमची कोणतीही हरकत नाही. मात्र, केवळ राजकीय द्वेषापोटी संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढणे कोणत्याही परिस्थितीत मान्य केले जाणार नाही आणि खपवूनही घेतले जाणार नाही.” ‘वंदे मातरम्’वरून सोनिया, राहुल गांधींवर हल्लाबोल बावनकुळे यांनी ‘वंदे मातरम्’च्या मुद्द्यावरूनही काँग्रेस पक्षाला चांगलेच धारेवर धरले. “वंदे मातरम् हे केवळ एक गीत नसून ती भारताची संस्कृती, संस्कार आणि आपला वैभवशाली वारसा जगभरात मजबूत करणारी आपली अस्मिता आहे. या गीताचा जाणीवपूर्वक अपमान करणे म्हणजे सोनिया गांधी, राहुल गांधी आणि त्यांच्या संपूर्ण काँग्रेस पक्षाकडून देशाचा अपमान करण्यासारखे आहे,” असा गंभीर आरोप बावनकुळे यांनी केला. तसेच, भारतात जर राहायचे असेल तर प्रत्येक नागरिकाला ‘वंदे मातरम्’ म्हणावेच लागेल, अशी अत्यंत आक्रमक भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली. काँग्रेसच्या या देशविरोधी भूमिकेचा जाब देशातील जनता आगामी २०२९ च्या निवडणुकीत नक्कीच विचारेल, असा इशाराही त्यांनी दिला. शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याचे भावनिक आवाहन बावनकुळे यांनी राज्याच्या चिंतेचा विषय असलेल्या शेती आणि पावसाच्या परिस्थितीवरही भाष्य केले. राज्यात यंदा पावसाची मोठी तूट निर्माण झाली आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या अनेक भागांत सरासरीच्या तुलनेत केवळ ६५ टक्के पाऊस झाला असून तब्बल ३५ टक्के पावसाची तूट आहे. या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांची मुख्य पिके असलेले सोयाबीन, कापूस यांसह इतर खरीप पिके अडचणीत आली आहेत. त्यामुळे राज्यातील बळीराजासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले असून शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे. मात्र, अशा अत्यंत कठीण आणि कसोटीच्या काळातही शेतकऱ्यांनी धीर सोडू नये आणि कोणत्याही परिस्थितीत आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे भावनिक आवाहन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. राज्य सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून लवकरच यातून मार्ग काढला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हेही वाचा.. जमिनीचा जुना इतिहास ते रेडी रेकनरचा दर:एका क्लिकवर मिळणार सगळी माहिती, महसूलमंत्री बावनकुळेंनी सुरू केले ‘महाभूमी स्टॅक’ राज्यातील जमिनीच्या खरेदी-विक्री आणि इतर सर्व व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि सुलभता आणण्यासाठी राज्य सरकारने ‘महाभूमी स्टॅक’ नावाचे एकात्मिक डिजिटल प्रवेशद्वार (ॲप) विकसित केले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषदेत या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली. याचबरोबर, राज्यातील आदिवासी शेतकऱ्यांना वनपट्टे आणि जमिनीचे मालकी हक्क देण्यासाठी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान एक विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *