![]()
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उच्च शिक्षणासाठी लंडनमधील प्रतिष्ठित लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये (LSE) प्रवेश घेतला आहे. त्यांनी TRIUM ग्लोबल MBA प्रोग्रामच्या पहिल्या मॉड्यूलला सुरुवात केल्याची माहिती सोशल मीडियावरील पोस्टद्वारे दिली आहे. वैद्यकीय क्षेत्रात ऑर्थोपेडिक्समध्ये एमएस पदवी घेतल्यानंतर डॉ. श्रीकांत शिंदे आता व्यवस्थापन आणि आर्थिक धोरणांचा अभ्यास करणार आहेत. ही त्यांची दुसरी पदव्युत्तर पदवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर उभे राहिल्याचा खास अनुभव LSEच्या कॅम्पसमध्ये पोहोचल्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर उभे राहण्याचा क्षण आपल्यासाठी अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी असल्याचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच संस्थेत शिक्षण घेतले होते. आपल्या ज्ञानाच्या आणि अभ्यासाच्या बळावर त्यांनी अर्थशास्त्राच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण संशोधन केले. त्यामुळे त्या ऐतिहासिक संस्थेत आज विद्यार्थी म्हणून प्रवेश करताना बाबासाहेबांच्या विचारांची आणि शिक्षणाच्या ताकदीची प्रकर्षाने जाणीव झाल्याचे शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. ‘मी खासदार असलो तरी इथे सर्वप्रथम विद्यार्थी’ कल्याणचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असलो तरी LSEच्या कॅम्पसमध्ये आपण सर्वप्रथम एक विद्यार्थी असल्याची भावना असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे. ऑर्थोपेडिक्समधील शिक्षणाने रुग्णांवर उपचार करण्याचे कौशल्य मिळाले. मात्र, आता व्यवस्थापन, अर्थव्यवस्था आणि विविध धोरणांशी संबंधित गुंतागुंतीचे विषय समजून घेण्यासाठी हा नवा अभ्यासक्रम मदत करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र आणि देशाच्या सेवेसाठी शिक्षणाचा उपयोग या नव्या शिक्षणातून मिळणारे ज्ञान आणि अनुभव भविष्यात आपल्या सार्वजनिक कार्यासाठी उपयोगी पडतील, असेही डॉ. श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र आणि देशाच्या सेवेसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्यास या शिक्षणाची मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यार्थी जीवन पुन्हा अनुभवण्याची संधी मिळत असल्याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला. व्याख्याने, वैचारिक चर्चा आणि नवीन गोष्टी शिकण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली असून, यावेळी अनुभवाची जोड असल्याचे त्यांनी सांगितले. तरुणांना दिला शिकत राहण्याचा संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा उल्लेख करत श्रीकांत शिंदे यांनी तरुणांना सतत शिकत राहण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही पदवी, नोकरी किंवा मोठे पद मिळाले तरी ज्ञान मिळवण्याची आणि नवीन गोष्टी शिकण्याची प्रक्रिया कधीही थांबवू नये, असा संदेश त्यांनी दिला. जग वेगाने बदलत असताना नवीन कौशल्ये आत्मसात करणे आणि सतत स्वतःला अपडेट ठेवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे खासदार आणि डॉक्टर अशी ओळख असलेल्या श्रीकांत शिंदे यांनी पुन्हा एकदा विद्यार्थी म्हणून सुरू केलेल्या या नव्या शैक्षणिक प्रवासाची सध्या चर्चा होत आहे. हेही वाचा.. केवळ पदवी नव्हे, तर विद्यार्थ्यांना उद्योगांच्या गरजांनुसार सक्षम करा:मंत्री चंद्रकांत पाटलांचे आदेश, तीन नव्या उपक्रमांवर विशेष भर महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील तरुण विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगार मिळवण्याची क्षमता आणि उद्योगसज्जता वाढवण्यासाठी आता उद्योगाभिमुख प्रशिक्षण, केंद्रीकृत प्लेसमेंट सुविधा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित विशेष कौशल्यविकास उपक्रम राबवण्यावर शासनाकडून मोठा भर दिला जाणार आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या एका महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत याविषयीचे सविस्तर नियोजन करण्यात आले. सविस्तर वाचा..
Source link
लंडनमध्ये पुन्हा विद्यार्थी बनले खासदार श्रीकांत शिंदे:बाबासाहेबांच्या आठवणींनी अनुभवला खास क्षण