![]()
एआयएमआयएमचे राष्ट्रीय प्रवक्ते वारिस पठाण यांनी सध्या राज्यातील आणि देशातील विविध राजकीय व सामाजिक मुद्द्यांवरून आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. नवरात्रोत्सवातील गरब्यातील मुस्लिमांचा प्रवेश, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे ‘वंदे मातरम्’ला दिलेले महत्त्व, सहारनपूर मशीद पाडल्याप्रकरणी राहुल गांधींचे मौन आणि इस्कॉन मंदिरातील आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाने केलेली कारवाई, या सर्व विषयांवर पठाण यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट भाष्य केले आहे. गरबा वादावर स्पष्टीकरण, जिथे सन्मान नाही, तिथे मुस्लिमांनी जाऊ नये नवरात्रोत्सवातील गरबा कार्यक्रमात मुस्लिमांना प्रवेश देण्यावरून आणि त्यांच्या ओळखपत्रांची (आधार कार्ड) तपासणी करण्यावरून सुरू असलेल्या वादावर वारिस पठाण यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, “काल मी एक विधान केले होते, मात्र काही लोकांनी ते तोडून-मोडून चुकीच्या पद्धतीने पसरवले आणि मोठा वाद निर्माण केला. आज मी पुन्हा स्पष्ट करू इच्छितो की, ज्या ठिकाणी आपला सन्मान होत नाही, तिथे मुस्लिमांनी जाऊ नये, असे माझे म्हणणे होते. ज्या ठिकाणी तुम्हाला टिळा लावण्याची सक्ती केली जाते आणि तुमचे आधार कार्ड तपासले जाते, अशा ठिकाणी मुस्लिमांनी का जावे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ‘मी वंदे मातरम् म्हणणार नाही’ जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे अलीकडेच एका कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’ या गीताच्या संपूर्ण गायनावेळी उभे राहिले होते. याविषयी विचारले असता पठाण म्हणाले, “ओमर अब्दुल्ला यांनी ते गीत गायले आणि ते उभे राहिले, त्याचा आदर केला पाहिजे. पण तुम्ही कोणावरही ते गाण्याची सक्ती करू शकत नाही. मी अगदी स्पष्टपणे सांगतो की, मी वंदे मातरम् म्हणणार नाही, विषय संपला.” काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर घणाघात सहारनपूर येथील मशीद पाडण्याच्या घटनेवर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कोणतेही ट्विट न केल्याबद्दल पठाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आम्ही नेहमीच सांगत आलो आहोत की भाजप ‘हार्ड हिंदुत्वा’चे राजकारण करते, तर काँग्रेस आणि समाजवादी पक्षासारखे स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणारे पक्ष ‘सॉफ्ट हिंदुत्वा’चे राजकारण करतात. या पक्षांसाठी मुस्लिम केवळ एक ‘व्होट बँक’ आहेत आणि सतरंज्या अंथरणारे कार्यकर्ते आहेत, त्यापेक्षा जास्त काहीही नाही,” असा थेट हल्लाबोल त्यांनी केला. तुकाराम मुंढे आणि एफडीएच्या कारवाईचे समर्थन मुंबईतील इस्कॉन मंदिराच्या (ISKCON) खाद्य आस्थापनांवर अस्वच्छतेच्या कारणावरून अन्न व औषध प्रशासनाने (FDA) केलेल्या निलंबनाच्या कारवाईचे वारिस पठाण यांनी उघडपणे समर्थन केले. ते म्हणाले, “एफडीए सरकार अंतर्गत अतिशय योग्य कारवाई करत आहे. आयुक्त तुकाराम मुंढे खूप चांगले काम करत आहेत. हॉटेल आणि रेस्टॉरंट्समध्ये जाऊन तिथे स्वच्छता आहे की नाही हे तपासणे आणि नियमांचे उल्लंघन किंवा अस्वच्छता आढळल्यास त्यांचा परवाना रद्द करणे हे प्रशासनाचे योग्य पाऊल आहे.” हेही वाचा.. मुस्लिम बांधवांनी गरब्यात सहभागी होण्यात काहीही गैर नाही!: अमृता फडणवीसांची परखड भूमिका; शांततेने उत्सवाचा आनंद घ्यायला हरकत नाही! गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गरब्यात मुस्लिमांना प्रवेश द्यायचा की नाही, यावरून महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापू लागले आहे. हिंदुत्ववादी संघटनांकडून गरबा आणि दांडिया कार्यक्रमांमध्ये मुस्लिमांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्याची मागणी होत असतानाच मंत्री नितेश राणे यांनीही ‘लव्ह जिहाद’चा मुद्दा उपस्थित करत मुस्लिम तरुणांना गरब्यात प्रवेश देऊ नये, अशी भूमिका मांडली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सविस्तर वाचा
Source link
जिथे आपला सन्मान नाही तिथे मुस्लिमांनी जाऊ नये:गरबा वादावरून वारिस पठाणांची भूमिका, राहुल गांधींवरही साधला निशाणा