Headlines

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाबाहेर गोंधळ:आमदार प्रकाश सुर्वेंचा धडक मोर्चा, पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून ठिय्या; उद्यान पर्यटकांसाठी तात्पुरते बंद




मुंबईतील बोरिवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाच्या मुद्द्यावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मालाड, कांदिवली, बोरिवली आणि दहिसर परिसरातील उद्यानाच्या जागेवर अतिक्रमण केलेल्या नागरिकांचे पुनर्वसन 3 किलोमीटरच्या अंतरातच करावे, अशी स्थानिकांची प्रमुख मागणी आहे. मात्र, त्यांना कल्याण-शिरढोण आणि खोणी येथे घरे दिली जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी महायुती सरकारमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी आक्रमक पवित्रा घेत, उद्यानाच्या संचालिका अनिता पाटील यांच्यावर दडपशाहीचे आरोप करत आज प्रशासनाविरोधात तीव्र मोर्चा काढला. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चामुळे संजय गांधी उद्यानाबाहेर आंदोलकांची मोठी गर्दी उसळली होती. सुरक्षेच्या कारणास्तव उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोलिसांची तीन स्तरीय बॅरिकेडिंग आणि मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तरीही आंदोलकांनी आक्रमक होत बॅरिकेडिंगचा पहिला टप्पा तोडून उद्यानाच्या आत प्रवेश करत ठिय्या मांडला. या वाढत्या तणावामुळे आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव हे उद्यान पर्यटकांसाठी तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी या तीव्र आंदोलनाचा मोठा फटका मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला बसला आहे. आंदोलकांनी पश्चिम द्रुतगती महामार्ग रोखून धरल्याने बोरिवलीहून अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली असून रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. उद्यानाला लागून असलेल्या आजूबाजूच्या परिसरातही याचा परिणाम जाणवत असून, ही कोंडी फोडण्यासाठी आणि वाहतूक लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनाची भूमिका आणि शासनाचा निर्णय दरम्यान, उद्यान प्रशासनाने आंदोलकांचे आणि आमदारांचे सर्व आरोप फेटाळून लावले असून, शासनाच्या नियमानुसारच पुनर्वसनाची प्रक्रिया राबवली जात असल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रश्नावर नुकतीच मुख्यमंत्र्यांच्या दालनात आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीतील निर्णयानुसार, म्हाडाकडून कल्याण आणि खोणी परिसरात उपलब्ध करून देण्यात आलेल्या 6500 सदनिकांमध्ये वन विभागाकडून या नागरिकांचे रीतसर स्थलांतर केले जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *