Headlines

संभाजीनगरच्या पाणीटंचाईवर ठाकरेंची शिवसेना आक्रमक:पाणी वितरण सुरळीत करा; अन्यथा रस्त्यावर उतरू; अंबादास दानवेंचा महानगरपालिका प्रशासनाला इशारा




छत्रपती संभाजीनगर शहरातील वाढत्या पाणीटंचाई आणि अनियमित पाणीपुरवठा संदर्भात शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांची भेट घेऊन शहरातील पाणीपुरवठा प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. 1 जानेवारी 2026 पासून आजपर्यंत 133 दिवस झाले असून शहराला किमान 44 वेळा पाणी मिळणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात फक्त 15 ते 16 वेळाच पाणीपुरवठा झाला आहे. प्रशासन तीन दिवसाआड पाणी येते असे सांगत असेल तर नागरिकांना 15 ते 16 दिवसांनी पाणी का मिळत आहे?” असा सवाल दानवे यांनी यावेळी उपस्थित केला. शहराला दररोज सुमारे 243 एमएलडी पाण्याची आवश्यकता असताना प्रत्यक्षात केवळ 151 एमएलडी पाणी उपलब्ध होत आहे. “दोन दिवसांत 300 एमएलडी पाणी शहरात येत असेल तर दोन दिवसाआड शहरात पाणीपुरवठा होणे अपेक्षित आहे.मात्र नागरिकांना 7 ते 8 दिवसांनी पाणी का मिळते?” असा प्रश्न अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. शहराच्या मध्यवर्ती भागातील गुलमंडी आणि शहागंज यांसारख्या भागांत 15 ते 16 दिवसांनी पाणी मिळत असून अनेक भागांत रात्री 2 वाजता पाणी सोडले जात आहे. सातारा परिसरातील नागरिकांचे विशेष हाल होत असून तेथे पाण्यासाठी मोठा आर्थिक खर्च करावा लागत आहे. सातारा परिसरात टाक्यांद्वारे पाणीपुरवठ्याची स्वतंत्र व्यवस्था करावी, अशी मागणी शिवसेना पदाधिकारी यांनी केली. भारतीय जनता पक्ष व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराला दररोज पाणी देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. शिवसेनेचा महापौर असताना शहरात 3 ते 4 दिवसाआड पाणीपुरवठा होत होता, तर ‘नो नेटवर्क झोन’मध्ये देखील तीन दिवसाआड टँकरद्वारे पाणी येणे अपेक्षित होते. मात्र सध्या अनेक भागांत 5 ते 6 दिवसांनी, तर काही ठिकाणी 8 ते 12 दिवसांनी पाणी मिळत असल्याची गंभीर परिस्थिती असल्याचे दानवे यांनी सांगितले. शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल पुढील 21 ते 22 दिवस अत्यंत कठीण आहेत. नागरिकांना अधिक पाण्याची गरज असताना प्रशासनाने डोळ्यात तेल घालून वितरण व्यवस्थेवर लक्ष ठेवले पाहिजे. अन्यथा ‘लबाडांनो पाणी द्या’सारखे तीव्र आंदोलन पुन्हा उभारावे लागेल,” असे कळवत नागरिकांच्या पाणीप्रश्नासाठी शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा अंबादास दानवे यांनी प्रशासनाला दिला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *