![]()
नोव्हेंबर महिन्यातही छत्रपती संभाजीनगर शहरातील कमाल तापमानात वाढ होत असून ४ नोव्हेंबरला शहराचा पारा ३५ अंशांपर्यंत पोहोचला. गेल्या ७३ वर्षांतील नोव्हेंबर महिन्यातील हे सर्वाधिक तापमान आहे. यापूर्वी १९ नोव्हेंबर २०१८ रोजी शहरात ३४.८ अंश तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर नोव्हेंबरमधील सर्वाधिक कमाल तापमानाचा विक्रम या वर्षी मोडला आहे. या वर्षी ऑक्टोबर महिन्यात छत्रपती संभाजीनगरमधील तापमान सातत्याने जास्त राहिले. ऑक्टोबरमधील सर्वाधिक उष्ण १० दिवसांपैकी आठ दिवस २०२६ या वर्षातील होते. त्यानंतर ऑक्टोबरच्या अखेरीस आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीला बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे तापमानात थोडी घट झाली होती. मात्र, ३ नोव्हेंबरपासून पुन्हा उकाडा वाढू लागला आहे. मंगळवारी ३३.६ अंश सेल्सियस असलेले तापमान बुधवारी एकाच दिवसात १.४ अंशांनी वाढून ३५ अंशांवर गेले. ३ नोव्हेंबरचे तापमान या महिन्यातील सर्वाधिक उष्ण दिवसांच्या यादीत सातव्या क्रमांकावर होते, तर ४ नोव्हेंबरचे तापमान आता पहिल्या क्रमांकावर आले आहे.
एक्स्पर्ट व्ह्यू तीन दिवसांत तापमान कमी होऊन थंडी येईल सध्या नोव्हेंबरचा पहिला आठवडा सुरू असला तरी ऑक्टोबर हीटचा प्रभाव अद्याप कायमच आहे. ढगाळ वातावरण नसल्यामुळे सूर्यकिरणे थेट जमिनीवर पडत आहेत. त्यामुळे उन्हाची तीव्रता वाढलेली आहे. तापमान वाढल्याने हवेचा दाब कमी होऊन पावसाची स्थिती निर्माण होते, परंतु सध्या तशी परिस्थिती नाही. येत्या रविवार किंवा सोमवारपर्यंत राज्यभरातच तापमान कमी होण्याची अपेक्षा आहे. यानंतर दिवस आणि रात्र दोन्हीचे तापमान कमी होऊन बोचरी थंडी जाणवू लागेल. डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ
Source link
संभाजीनगरमध्ये तापमान 35 अंशांवर; नोव्हेंबर महिन्यातील 73 वर्षांचा उच्चांक:2018 सालच्या नोव्हेंबर महिन्यातील 34.8 अंशांचाही विक्रम मोडीत