![]()
छत्रपती संभाजीनगर-जालना आणि परभणी-हिंगोली या दोन स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. छत्रपती संभाजीनगर-जालना ही जागा महायुतीत शिवसेनाच लढवणार असल्याचा दावा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. शिवसेनेकडून सध्याचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ आणि माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह अनेक पदाधिकारी इच्छुक आहेत. विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे हे यापूर्वी आमदार होते. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने या जागेसाठी निवडणूक जाहीर केली आहे. 18 जून रोजी मतदान होणार आहे. पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, ही जागा आम्हीच लढणार आहोत. याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल. शिवसेना महायुतीकडून आमचाच उमेदवार रिंगणात असेल. मात्र, उमेदवाराचे नाव निश्चित झाले नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतिम निर्णय घेतील, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे नगरपालिकेत 54, महानगरपालिकेत 13 आणि जिल्हा परिषदेत 21 सदस्य आहेत. या निवडणुकीसाठी अनेक दावेदार आहेत. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले कैलास गोरंट्याल यांच्या नावाचीही चर्चा आहे. भाजपचे संख्याबळ वाढले- सावे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची ताकद वाढल्याने यावर भाजपचा दावा असल्याचे राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. पक्षश्रेष्ठी यासंबंधी निर्णय घेतील, परंतु हा मतदारसंघ आता भाजप सक्षमपणे लढवून जिंकू शकतो, असा दावाही मंत्री सावे यांनी केला आहे. मविआकडून उद्धवसेना लढणार- दानवे महाविकास आघाडीकडून गेल्या वेळी अंबादास दानवे या जागेवरून आमदार होते. त्यामुळे ही जागा आम्हीच लढवणार असल्याचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितले. आमचे संख्याबळ कमी दिसत असले, तरी महाविकास आघाडी म्हणून आम्ही संपूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवू आणि जिंकू,’ असाविश्वास दानवे यांनी व्यक्त केला. आकडेमोड सुरू बहुमताचा अंदाज आल्यानंतर भाजप हक्काचा विधान परिषदेमधील एक सदस्य कमी होऊ देणार नाही. यासाठी भाजपने आकडेमोड सुरू केली आहे.भाजप स्वबळावर ही निवडणूक जिंकेल, असा विश्वास श्रेष्ठींना वाटत आहे. भाजपकडून सावध पाऊल नुकत्याच झालेल्या मनपा निवडणुकीत भाजप,शिवसेनेची युती तुटली होती. जिल्हा परिषदेत शिंदेसेनेने भाजपला अंधारात ठेवून बी फॉर्म दिले होते. दोन्ही ठिकाणी भाजपची सरशी झाली. जालना महापालिकेत बहुमताने भाजपची सत्ता आली. या पार्श्वभूमीवर भाजप आता ताकही फुंकूण पित आहे. परभणी-हिंगोलीवरही उद्धवसेनेचा दावा परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून देखील उद्धवसेनाच निवडणूक लढणार असल्याचे आमदार राहुल पाटील यांनी स्पष्ट केले. गेल्या निवडणुकीत शिवसेनेचेच विप्लव बजोरिया येथून निवडून आले होते. त्यामुळे महाविकास आघाडीत ही जागा आमच्याकडेच राहील, असे त्यांनी सांगितले. नंदकुमार घोडेले इच्छूक उपमहापौर राजेंद्र जंजाळ या संदर्भात म्हणाले, उमेदवारी कोणाला द्यायची, याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. आमच्याकडे पुरेसे संख्याबळ असल्याने महायुतीचाच उमेदवार विजयी होईल. दुसरीकडे, माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनीही या जागेसाठी इच्छा दर्शवली आहे.
Source link
संभाजीनगर-जालना जागेवर शिवसेनेचा दावा; पालकमंत्री म्हणतात, येथे आम्हीच जिंकणार:शिंदेसेनेकडून माजी महापौर नंदकुमार घोडेले, विद्यमान उपमहापौर राजेंद्र जंजाळ इच्छुक