Headlines

वाशीम बायपास रोडवर थरार:गॅरेजसमोरील वाहनांना आग




शहरातील वाशीम बायपास रोडवरील बुद्धनगर परिसराजवळ सोमवारी सकाळी एक थरारक, भीषण आगीची घटना घडली. येथील एका ऑटो गॅरेज व सर्व्हिस सेंटरसमोर दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांना अचानक भीषण आग लागली. आग इतकी वेगाने पसरली की काही क्षणांतच तिने रौद्ररूप धारण केले. लगत असलेल्या महावितरणच्या विद्युत डीपी (रोहित्र) व त्यावरील जिवंत तारांपर्यंत आगीच्या ज्वाळा पोहोचल्या. त्यामुळे परिसरात काही काळ प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रसंगी उमेश इंगळे यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. त्यांनी तात्काळ परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. त्यांनी अग्निशामक विभाग प्रमुख मनीष कथले यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी डायल ११२ वर फोन करून पोलिस प्रशासनालाही घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाचे जवान निखिल आपोतीकर, सचिन माहोरे, दिनेश वाघमारे, तसेच वाहनचालक धर्मकुमार वाकोडे यांनी अग्निशामक बंबासह अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळ गाठले. जवानांनी पाण्याचा मारा केला. त्यांनी विद्युत डीपी व वाहनांना लागलेली आग पूर्णपणे आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले. गॅरेज व सर्व्हिस सेंटरबाहेर उघड्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. इंधनामुुळे शेजारची कारही पेटली प्रारंभी एकाच वाहनाला आग लागली होती, परंतु वाऱ्याचा वेग आणि इंधनामुळे शेजारीच पार्क केलेल्या दुसऱ्या चारचाकी वाहनानेही पेट घेतला. आग आणखी पसरू नये आणि इतर वाहने सुरक्षित राहावीत यासाठी घटनास्थळी हजर असलेल्या स्थानिक नागरिकांनी मोठे धाडस दाखवले. त्यांनी जवळच उभ्या असलेल्या इतर वाहनांच्या काचा फोडून, हँडब्रेक रिलीज केले आणि ती वाहने नागरिकांच्या मदतीने ढकलत सुरक्षित अंतरावर हलवली. वाशीम बायपाससारख्या गजबजलेल्या रस्त्यावर हा थरार सुरू असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *