Headlines

सचिन अहिर यांची डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानी भेट:विधानपरिषद कामकाजासह पक्ष संघटनेवर चर्चा




महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान उपसभापती सचिन अहिर यांनी सोमवारी शिवसेना नेत्या व महाराष्ट्र विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील ‘सिल्व्हर रॉक्स’ या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी श्रीगणेशाची मूर्ती, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन अहिर यांचा सन्मान केला. तसेच, अहिर यांनीही डॉ. नीलम गोऱ्हे यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. या भेटीदरम्यान विधान परिषदेचे कामकाज अधिक प्रभावी, लोकाभिमुख आणि परिणामकारक करण्याबाबत तसेच संसदीय परंपरा आणि सभागृहाची गुणवत्ता अधिक बळकट करण्याच्या विविध पैलूंवर दोन्ही नेत्यांमध्ये विचारविनिमय करण्यात आला. तसेच, शिवसेना पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तळागाळातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सातत्यपूर्ण संवाद, शासनाच्या लोककल्याणकारी योजना याबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. यावेळी शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद (नाना) भानगिरे, युवासेना प्रदेश सचिव किरण साळी, आनंद गोयल, हेमंत बागुल, संदीप शिंदे, महिला आघाडीच्या कांताताई पांढरे, पूजा रावेतकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. खेड-आळंदी-चाकण भागातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली डॉ. गोऱ्हे यांची भेट खेड-आळंदी-चाकण परिसरातील विकासकामांना अधिक गती देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असून, स्थानिक गरजा लक्षात घेऊन विकासाचा सर्वंकष आराखडा तयार करण्यात येईल असे आश्वासन शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी खेड-आळंदी-चाकण भागातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिले. खेड-आळंदी-चाकण भागातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पुणे येथील सिल्व्हर रॉक्स या निवासस्थानी डॉ. गोऱ्हे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी या भागातील विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आगामी काळात शासनाच्या अधिकाधिक योजना प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, असे मार्गदर्शन डॉ. गोऱ्हे यांनी केले. महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देत महिला शेतकरी ओळखपत्राचा अधिकाधिक लाभ मिळावा, महिला बचत गटांना शासकीय जमिनी उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत, तसेच बचत गटांच्या माध्यमातून स्थानिक महिलांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला. याखेरीज, इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक त्या उपाययोजनांचा पाठपुरावा व चाकण औद्योगिक परिसरातील स्थानिक नागरिक आणि कामगारांना भेडसावणारे एमआयडीसीमधील विविध प्रश्न उद्योग विभागाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक प्रयत्न करण्यात येतील, असे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. तसेच, या भागातील विकासकामांसाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाहीही डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *