Headlines

सरकारने घेतले 'फरार गँग'चे पालकत्व:आरोपी फरार झाले की, त्यांना सरकारी सेफ पॅसेज मिळाला, ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंचा सवाल




मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने राज्यातील विविध प्रकरणातील फरार गँगचे पालकत्व घेतल्याची तिखट टीका ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केली आहे. मुख्यमंत्री गुन्हेगारांना कडक शासन करण्याची आपली रेकॉर्डेट कॅसेट वाजवतात, पण प्रत्यक्षात अनेक प्रकरणातील आरोपी अद्याप सापडले नाहीत. हे आरोपी स्वतःहून गायब झाले की, त्यांना सरकारी सेफ पॅसेज देऊन गायब केले गेले? असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. राज्यात भोंदू अशोक खरात व नाशिकच्या लव्ह जिहाद प्रकरणाने रान पेटले आहे. या प्रकरणी सत्ताधारी व विरोधी पक्षांत कलगीतुरा रंगला असताना आता अंबादास दानवे यांनी या प्रकरणी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी बुधवारी एका पोस्टद्वारे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधून एकप्रकारे त्यांच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थिति केले आहे. ‘लूज एंड्स’ ठेवून गुन्हेगारांना मोकळे रान अंबादास दानवे आपल्या पोस्टमध्ये मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हणाले, हे सरकार चालवत आहेत की ‘फरार गँग’चे पालकत्व घेत आहेत? ​एकीकडे मुख्यमंत्र्यांची ‘रेकॉर्डेड’ कॅसेट वाजत असते: 1. कडक कारवाई करू!
2. सखोल चौकशी करू!
3. कोणालाही सोडणार नाही!
4. कठोर शासन करू! ​पण प्रत्यक्ष जमिनीवरचे वास्तव काय? 1. ​नाशिक लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपी निदा फरार!
2. ​भोंदू अशोक खरातची बायको फरार!
3. ​याच खरातचा ‘लाडका’ सुपुत्र पसार!
4. ​संतोष देशमुख प्रकरणातील कृष्णा आंधळे अजूनही फरार!
5. ​महादेव मुंडे प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाट! ​सवाल हा आहे की, आरोपी स्वतःहून गायब झालेत की त्यांना सरकारी ‘सेफ पॅसेज’ देऊन गायब केले गेले आहे? खटल्यांमध्ये जाणीवपूर्वक ‘लूज एंड्स’ ठेवून गुन्हेगारांना मोकळे रान करून दिले जात आहे का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. औरंगाबाद नामांतरावरूनही निशाणा अंबादास दानवे यांनी दोन दिवसांपूर्वी महसूल विभागाच्या कागदपत्रांवरील औरंगाबाद नामोल्लेखावरूनही सरकारवर निशाणा साधला होता. नामांतराचे ढोल वाजवणाऱ्या भाजप – शिंदे – पवार सरकारच्या नाकाखाली, महसूल विभागाच्या कागदपत्रांवर अजूनही ‘औरंगाबाद’ नाचतेय. ही अधिकाऱ्यांची ‘मोगली मानसिकता’ आहे आणि सरकारचा दुटप्पीपणा देखील! ​एकीकडे नावावरून निधी रोखण्याची धमकी द्यायची आणि दुसरीकडे सरकारी जीआरमध्ये औरंगजेबाचीच शाई वापरायची; हा ‘अंधळेपणा’ नसून मुघल सरंजामशाहीचा प्रभाव आहे. तुमचं मंत्रालय आता शासन निर्णय कमी आणि शाही फर्मान अधिक काढते आहे, असे ते म्हणआले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *