![]()
शहरातील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या मोहरम मधील इमाम हसन व इमाम हुसेन यांच्या सवारीची ‘कत्तलची रात्र’ व विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली. मात्र, या दोन्ही मिरवणूका बराचवेळ रेंगाळल्या. कत्तलची रात्र मिरवणूक शनिवारी रात्री बारा वाजता सुरू झाली.
.
दोन्ही मिरवणुका पारंपारिक मार्गाने काढण्यात आल्या. त्यासाठी सुमारे एक हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी असा मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गुरुवारी मध्यरात्री कोठलामधून छोटे इमाम व मंगलगेट हवेली भागातून बडे इमाम यांच्या सवाऱ्यांची ‘कत्तलची रात्र’ मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत पाच टेंभ्यांना परवानगी देण्यात आली होती. मध्यरात्री १२ वाजता मिरवणुकीस सुरुवात झाली. मंगलगेट हवेली, दाळ मंडई, तेलीखुंट, शहाजी रोड, मोचीगल्ली, जुना बाजार, अर्बन बँक रोड, आनंदी बाजार, कोर्टगल्ली, सबजेल चौक, जुनी महापालिका, पंचपीर चावडी, धरती चौक, हातमपुरा, रामचंद्र खुंट मार्गाने दोन्ही सवाऱ्या सकाळी पुन्हा आपापल्या जागी नेण्यात आल्या.
शुक्रवारी दुपारी १२ वाजता विसर्जन मिरवणुकीला पुन्हा सुरुवात झाली. दोन्ही सवाऱ्या खेळवत पारंपारिक मार्गाने नेण्यात आल्या. विविध ठिकाणी भाविक त्यावर फुलांची चादर चढविण्यात आली. सरबताच्या गाड्यांना जुन्या महापालिकेपर्यंत परवानगी देण्यात आली होती. मात्र, ही मिरवणूक रेंगाळली. आठच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्यानंतर अर्ध्या तासात सवारी दिल्लीगेट वेशीजवळ पोहचली. पावणेनऊच्या सुमारास सवारी वेशीबाहेर पडली. रात्री उशिरा सावेडी गावात सवाऱ्यांचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान, दरवर्षी मिरवणूक रेंगळण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील वर्षीही मिरवणूक रेंगाळली होती. यापूर्वी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सवारी वेशीबाहेर पडत होती.