![]()
छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना आणि भाजप महायुती करूनच लढण्याचे निश्चित झाले आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडे मुंबईत महायुतीच्या प्रमुखांची बैठक पार पडली. त्यामध्ये एकत्र निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे मनपा आणि जिल्हा परिषदेत स्वतंत्र निवडणुका लढवलेले हे तिन्ही पक्ष सहकाराची निवडणूक एकत्र लढणार आहेत. छत्रपती संभाजीनगरात २१ संचालकांच्या जागांसाठी निवडणूक होत आहे. सुरुवातीला शिवसेनेच्या दिग्गज उमेदवारांवर आक्षेप घेण्यात आले होते. त्यामध्ये ४५ अर्ज अवैध ठरवले होते. आमदार संजना जाधव, समीर सत्तार, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुवर्णा जाधव यांनी अपील केले होते. त्यांचे अर्ज विभागीय सहनिबंधकांकडे वैध ठरले आहेत. ३ पक्षांच्या नेत्यांनी केली चर्चा मुंबई पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या दालनात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये ही बैठक पार पडली. यामध्ये ओबीसी विकास मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, आमदार अब्दुल सत्तार, आमदार सतीश चव्हाण यांच्यासमवेत बैठकीत जागांवर चर्चा झाली आहे. रविवारी जागावाटप अंतिम केले जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री शिरसाट यांनी दिली. कार्यकर्त्यांना लढवले, नेत्यांसाठी मात्र युती मनपा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकांमध्ये सत्ताधारी महायुतीमधील पक्ष स्वबळावर रिंगणात उतरले होते. कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याचे सांगत सर्वांनी आपापल्या समर्थकांसाठी जोर लावला होता. सहकार क्षेत्रात राजकारण आणू नये असे संकेत आहेत. मात्र, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांनी महायुती करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे अन्य निवडणुकांप्रमाणे येथेही जागावाटपही करण्यात येत आहे. एकत्र निवडणूक लढवणार महायुती म्हणून आम्ही एकत्र निवडणूक लढवणार आहोत. जागावाटपाबाबत चर्चा सुरू असून लवकरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. – संजय शिरसाट, पालकमंत्री निवडणुकीआधी अध्यक्षाची चर्चा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून विलास भुमरे, समीर अब्दुल सत्तार यांची नावे चर्चेत आहेत. याबाबत खासदार संदिपान भुमरे म्हणाले की, महायुती म्हणून आम्ही एकत्र लढणार आहोत. आमच्याकडून अध्यक्षपदाचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर उपमुख्यमंत्री घेतील. एकनाथ शिंदे ज्यांचे नाव सुचवतील तेच अंतिम असेल. भाजपकडून अतुल सावे यांचे नाव चर्चेत आहे. अध्यक्षपदाबाबत विचारले असता जिल्हा मध्यवर्ती बँकेत चांगले प्रशासक जावेत यासाठी मी निवडणूक लढवत असल्याचे सावे यांनी सांगितले. शिवसेना आणि भाजप यांच्याकडून अनेक दिग्गज उमेदवार संचालकपदासाठी निवडणूक लढवत आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत एकूण २१ संचालक पदे आहेत. महायुती म्हणून एकत्र लढणार जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक आम्ही एकत्रित लढणार आहोत. जागावाटपाचा निर्णय अंतिम करणार आहोत. लवकरच याचा निर्णय होईल. – अतुल सावे, ओबीसी विकास मंत्री
Source link
सहकाराचा आखाडा:जिल्हा बँक निवडणुकीत महायुती; जागांचे वाटप शेवटच्या टप्प्यात, मंत्री सावे, विलास भुमरे, सत्तार अध्यक्षपदासाठी इच्छुक