![]()
राज्यातील सहकारी संस्थांचे कामकाज अजूनही १९६० च्या जुन्या कायद्याने सुरू असल्याने त्यात बदल करणे गरजेचे आहे. सहकार चळवळीला नवी संजीवनी देण्यासाठी सहकारातील राजकीय हस्तक्षेप आणि भ्रष्टाचार पूर्णपणे थांबवावा लागेल. तसेच, ही चळवळ पुढील पिढीने चालवण्यासाठी आता युवा व महिलांना पुढे आणणे गरजेचे असून, वर्षानुवर्षे पदावर असलेल्या ज्येष्ठांनी आपल्या खुर्च्या खाली केल्या पाहिजेत, असे प्रतिपादन सहकार भारतीचे प्रदेश महामंत्री विवेक जुगादे यांनी केले. सहकार भारतीच्या अहिल्यानगर दक्षिण विभागाच्या वतीने आयोजित ‘सहकार संवाद’ कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. व्यासपीठावर नागेबाबा मल्टीस्टेटचे कडूभाऊ काळे, सहकार भारतीचे नूतन जिल्हाध्यक्ष अजिनाथ हजारे, उमेश देवकर, ॲड. रवी बोरावके व इतर मान्यवर उपस्थित होते. विवेक जुगादे म्हणाले, देशाचे पहिले सहकारमंत्री अमित शहा यांनी केंद्रीय पातळीवर सहकार चळवळ स्वच्छ व पारदर्शक केली आहे. त्याच धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात नवे सहकार धोरण आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या धोरणामुळे सहकारी संस्थांचा जाच कमी होऊन राज्याची अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल. जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी सहकार भारतीच्या उपक्रमांचे कौतुक केले. ते म्हणाले, “नागरी सहकारी पतसंस्थांमध्ये केवळ संख्यात्मक वाढ न होता गुणात्मक वाढ झाली पाहिजे. संस्थांनी आपापसातील व्याजाची जीवघेणी स्पर्धा कमी करून योग्य व्याजदर आकारल्यास पतसंस्था कधीच अडचणीत येणार नाहीत.” अध्यक्षीय भाषणात कडूभाऊ काळे यांनी सहकार चळवळीच्या शुद्धीकरणासाठी सहकार भारती उत्कृष्ट कार्य करत असल्याचे नमूद केले. यावेळी झालेल्या विशेष चर्चासत्रात जिल्ह्यातील पतसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या विविध अडीअडचणी व प्रश्न मांडले, ज्याची जुगादे यांनी गांभीर्याने नोंद घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजिनाथ हजारे यांनी केले, सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी , तर आभार उमेश देवकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश खामकर, आशा कराळे आणि वैभव जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले. बुडालेली बँक ७०८ कोटी नफ्यात! “भ्रष्टाचारामुळे तोट्यात गेलेल्या राज्य सहकारी बँकेवर सहकार भारतीचे विद्याधर अनास्कर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांनी स्वच्छ व पारदर्शक कारभाराच्या जोरावर अवघ्या ८ वर्षांत बँकेचे चित्र बदलले. या वर्षी या बँकेला तब्बल ७०८ कोटी रुपयांचा विक्रमी नफा झाला आहे. सहकार भारतीच्या संस्कारित कार्यपद्धतीचे हे ज्वलंत उदाहरण आहे,” अशी माहिती विवेक जुगादे यांनी दिली.
Source link
सहकारातील राजकीय हस्तक्षेप अन् भ्रष्टाचार पूर्णपणे थांबवावा लागेल:सहकार भारतीचे प्रदेश महामंत्री विवेक जुगादे यांचे प्रतिपादन