![]()
बालरंगभूमीवर गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ सातत्याने आपल्या सेवाकार्याद्वारे अमूल्य योगदान देणाऱ्या अहिल्यानगर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सौ. सुधा प्रकाश कांकरिया यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईत आयोजित एका भव्य सोहळ्यात महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते त्यांना हा मानाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते. याप्रसंगी आमदार महेश सावंत, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, जीवनगौरव पुरस्कार विजेते ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, स्वाती चिटणीस, शशी प्रभू, मोहन जोशी, नरेश गडेकर, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया आदी उपस्थित होते. नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी स्वागत केले. या प्रसंगी बोलताना सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार म्हणाले, अभिनयाच्या व्यक्तिस्वातंत्र्याम ध्ये मनाची संवेदनशीलता, समाजातील प्रगल्भशीलता आणि देशहिताची भावना सहजपणे मांडणारी व्यवस्था म्हणजे नाटक आहे. नाट्य परिषदेच्या अहिल्यानगर शाखेचे अध्यक्ष अमोल खोले, उपनगर शाखेचे अध्यक्ष प्रसाद बेडेकर व मध्यवर्ती कोषाध्यक्ष सतीश लोटके यांनी डॉ. कांकरिया यांचे अभिनंदन केले आहे. सूत्रसंचालन उत्तरा मोने यांनी, तर आभार उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी मानले. बालरंगभूमी ‘तारे जमीं पर’ घडवणारी संस्कारशाळा पुरस्काराला उत्तर देताना डॉ. सुधा कांकरिया म्हणाल्या, “बालरंगभूमी ही एक संस्कारशाळा आहे, जिथे छोटी बालके घडतात आणि ‘तारे जमीं पर’ निर्माण होतात. दोन तपांपेक्षा जास्त कालखंडात अखंडपणे सुरू असलेला ‘कांकरिया करंडक’ हा देशातील एकमेव उपक्रम आहे. या महोत्सवातील अनेक सितारे आज चित्रपट, व्यावसायिक नाटके आणि टीव्ही सिरीयल्समध्ये चमकत आहेत. हा पुरस्कार मी त्या सर्व बालकलाकारांना, डॉ. कांकरिया परिवार, मानकन्हैय्या ट्रस्ट आणि अहिल्यानगरच्या नाट्यकर्मींना समर्पित करते.”
Source link
डॉ. सुधा कांकरिया यांना मराठी नाट्य परिषदेचा विशेष पुरस्कार:सांस्कृतिक मंत्री शेलारयांच्या हस्ते गौरव