![]()
येथील श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था संचलित कृषि विज्ञान केंद्र (केव्हीके), दहीगाव आणि कॉमन सर्विस सेंटर, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या सचिवांसाठी आयोजित करण्यात आलेले १५ दिवशीय “खते, बियाणे, कीटकनाशके व कृषी निविष्ठा परवानाधारक विक्रेता प्रशिक्षण झाले. १ ते १५ जून २०२६ या कालावधीत झालेल्या या निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाला प्रशिक्षणार्थींचा प्रतिसाद लाभला. या प्रशिक्षणात जिल्ह्यातील अकोले, कोपरगाव, नेवासा, पाथर्डी, राहुरी, संगमनेर, शेवगाव आणि राहाता तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे सचिव व प्रतिनिधी अशा एकूण ३० जणांनी सहभाग नोंदविला होता. १५ दिवसांच्या या प्रशिक्षणामध्ये कृषी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण विषयांवर तज्ज्ञ शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. यात रासायनिक खतटंचाईच्या पार्श्वभूमीवर युरिया व डीएपी ला पर्याय म्हणून मिश्र-संयुक्त खतांचा वापर आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन. नैसर्गिक शेती तंत्रज्ञान, बियाणे व पीक उत्पादन तंत्रज्ञान, तण व्यवस्थापन आणि एल निनोचा शेतीवरील प्रभाव. कीड व रोगांची ओळख, एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि सुरक्षित कीटकनाशक वापर. व्यवसाय व्यवस्थापन: कृषी निविष्ठा विक्रीसंबंधी कायदे-नियम, कृषी सेवा केंद्राचे प्रभावी व्यवस्थापन, साठा नियंत्रण (स्टॉक मेंटेनन्स) आणि ग्राहक सेवा कौशल्ये. केवळ सैद्धांतिक ज्ञानावर भर न देता, प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी प्रात्यक्षिके, गटचर्चा, क्षेत्र भेटी (फील्ड व्हिजिट) आणि अध्ययन सहलींचे (स्टडी टूर) आयोजन करण्यात आले होते. समारोप प्रसंगी बोलताना शिक्षण संस्थेचे संचालक काकासाहेब शिंदे म्हणाले, कृषी निविष्ठा विक्रेत्यांची भूमिका केवळ खते-बियाणे विकण्यापुरती मर्यादित नाही. त्यांनी शेतकऱ्यांना योग्य, वेळेवर आणि शास्त्रशुद्ध सल्ला देणारा सक्षम मार्गदर्शक म्हणून काम करणे गरजेचे आहे. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन उत्पादन वाढण्यास मदत होईल. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. श्यामसुंदर कौशिक म्हणाले, प्रशिक्षणार्थींनी या १५ दिवसांतून प्राप्त केलेले ज्ञान आणि तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवून त्यांच्या प्रगतीसाठी उपयोगात आणावे. या कार्यक्रमासाठी नवी दिल्ली येथून कॉमन सर्विस सेंटरचे मॅनेजर मिथिलेश सिंग ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. “रासायनिक खतांच्या टंचाईच्या काळात शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळवण्यासाठी सहकार क्षेत्रातील या प्रशिक्षित मनुष्यबळाचा मोठा वाटा राहणार आहे, असे ते म्हणाले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कॉमन सर्विस सेंटरचे उपाध्यक्ष रस्तोगी देवेंद्र यांचे सहकार्य लाभले.
Source link
खत विक्री नव्हे, तर विक्रेते बनणार शेतकऱ्यांचे मार्गदर्शक:15 दिवसांच्या कृषी प्रशिक्षणाचा दहीगाव येथे झाला यशस्वी समारोप