![]()
दिवंगत अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेला सहा महिने पूर्ण होऊनही अंतिम चौकशी अहवाल जाहीर न झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांसह बारामतीतील नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार यांनी तपास यंत्रणांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, या दुर्घटनेमागील सत्य लवकरात लवकर जनतेसमोर आणण्याची मागणी केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की, अजित पवार यांच्या निधनाला सहा महिने पूर्ण झाले, मात्र अद्यापही या दुर्घटनेबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. प्राथमिक अहवालावर समाधान नसल्याचे सांगत त्यांनी सखोल आणि पारदर्शक चौकशीची मागणी केली. प्राथमिक अहवाल आम्हाला पटलेला नाही युगेंद्र पवार म्हणाले, “अजित दादांना जाऊन आज सहा महिने झाले. हा काळ कसा गेला हे कळलंच नाही. पहिल्या दिवसापासून आमची एकच मागणी आहे की, या दुर्घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे. पहिल्या महिन्यात प्राथमिक अहवाल आला, मात्र तो आम्हाला पटलेला नाही. त्या अहवालातील अनेक मुद्दे चुकीचे असल्याची आमची भावना आहे.” त्यांच्या मते, इतक्या मोठ्या दुर्घटनेनंतरही अंतिम निष्कर्ष अद्याप समोर न आल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे. सहा महिने झाले, तरी सत्य समोर आलेले नाही युगेंद्र पवार म्हणाले की, “आम्ही संयम ठेवला. दुसरा अहवाल येईल, तिसरा अहवाल येईल, अशी अपेक्षा होती. पण सहा महिने उलटून गेले तरी सत्य जनतेसमोर आलेले नाही.” यावेळी त्यांनी अलीकडील अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेचाही उल्लेख केला. अशा मोठ्या घटनांमध्ये चौकशी प्रक्रिया वेळ घेते, हे मान्य असले तरी जनतेच्या मनातील शंका दूर करण्यासाठी तपास यंत्रणांनी नियमित माहिती द्यायला हवी, असे त्यांनी नमूद केले. मुंबई विमानतळाचे CCTV फुटेजही समोर आलेले नाही चौकशीतील विलंबावर नाराजी व्यक्त करत युगेंद्र पवार म्हणाले, “आजही मुंबई विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक झालेले नाही. त्या दिवशी नेमके काय घडले, हे जनतेला कळले पाहिजे. सीआयडी, डीजीसीए आणि इतर यंत्रणा चौकशी करत असतील, तर निष्कर्ष यायला एवढा विलंब का होत आहे? हा प्रश्न बारामतीतील प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे.” आमचा संयम सुटत चाललाय युगेंद्र पवार यांनी तपास यंत्रणांना अंतिम अहवाल लवकर सादर करण्याचे आवाहन केले. “सहा महिने आम्ही संयम ठेवला. पण इतका काळ उलटूनही काहीच स्पष्ट झालेले नाही. इतकी मोठी दुर्घटना घडूनही संबंधितांवर कारवाई झाल्याचे दिसत नाही. आता आमचा संयम सुटत चालला आहे. बारामतीकरांना सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे. चौकशीत जे काही निष्पन्न झाले असेल, ते जनतेसमोर मांडले पाहिजे,” असे ते म्हणाले. शरद पवार–पंतप्रधान मोदी भेटीवरही प्रतिक्रिया काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेल्या भेटीबाबतही युगेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “शरद पवार हे देशातील सर्वात अनुभवी नेत्यांपैकी एक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अनेकदा त्यांचा अनुभव मान्य केला आहे. कॉकरोच जनता पार्टीने जंतर-मंतर येथे केलेल्या आंदोलनातून मार्ग काढण्यासाठीच शरद पवार यांनी पंतप्रधानांची भेट घेतल्याचे त्यांनी स्वतः स्पष्ट केले आहे. त्यानंतर केंद्र सरकारने तातडीने निर्णय घेत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा स्वीकारल्याचे दिसून आले.” दरम्यान, अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेच्या चौकशीचा अंतिम अहवाल अद्याप जाहीर झालेला नसल्याने या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांचेही लक्ष लागले आहे. युगेंद्र पवार यांनी केलेल्या मागणीनंतर या चौकशीबाबत पुढे काय निर्णय होतो, याकडेही आता लक्ष लागले आहे. हेही वाचा… 3 महिन्यांत 21 हजारांवरून थेट टॉप 100 मध्ये!:MPSCच्या ‘त्या’ तीन विद्यार्थ्यांच्या निकालाने खळबळ; मेहबूब शेख यांचे गंभीर आरोप
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या भरती प्रक्रियेतील संशयाचे धुके अधिकच गडद झाले आहे. या परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप करत आमदार रोहित पवार यांनी यापूर्वीच आक्रमक भूमिका घेतली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते मेहबूब शेख यांनी या परीक्षेतील तीन उमेदवारांच्या निकालांची आकडेवारीच जाहीर करत अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अवघ्या तीन महिन्यांच्या अंतराने झालेल्या दोन परीक्षांमध्ये एकाच विद्यार्थ्याच्या रँकमध्ये 21 हजारांवरून थेट पहिल्या शंभरात झालेली झेप संशयास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मेहबूब शेख यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी जयंत पाटलांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र:NEET आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे तत्काळ मागे घ्या; बिहार-आसामच्या धर्तीवर परिपत्रक काढा!
NEET पेपरफुटी प्रकरणाविरोधात देशभरात आणि राज्यात झालेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर सध्या पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे व पोलिस कारवाई तात्काळ मागे घेण्याची आग्रही मागणी केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
सहा महिने झाले, तरी सत्य समोर आलेले नाही:आमचा संयम सुटत चाललाय; अजित पवार विमान दुर्घटनेच्या चौकशीवर युगेंद्र पवारांची तीव्र प्रतिक्रिया