Headlines

सांगोला बाजारात 15 हजारहून अधिक मेंढरं; आंध्र, कर्नाटकातून आले मेंढपाळ:नागपंचमीनिमित्त सांगोला मार्केट यार्डामध्ये पाच एकर परिसरामध्ये भरला बाजार‎


.

नागपंचमीनिमित्त सांगोला येथील मार्केट यार्डतील मेंढरांच्या बाजारात १५ हजारहून अधिक मेंढरं विक्री व प्रदर्शनासाठी दाखल झाली. काही बांधवांनी वाजत-गाजत जेसीबीमधून मेंढरं आणली होती. महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्र प्रदेशातून मेंढपाळ बांधव मोठ्या संख्येने मेंढरं विक्री व प्रदर्शनासाठी घेऊन आले होते. मागील तीन वर्षांपासून हा मेंढरांचा बाजार भरतो आहे. नागपंचमीनिमित्त सोमवारी सांगोल्यातील मेंढरे बाजारात पारंपरिक पद्धतीने हलगीच्या तालावर, कोणी जेसीबीतून मिरवणुका काढून आणले होते. या बाजारात विविध जातींची आणि आकर्षक ठेवणीची मेंढरे पाहायला मिळाली. उत्तम शरीरयष्टी, लांब मान, मोठे डोके, आकर्षक चेहरा, अंगावरील चमकदार व दाट केस तसेच लांब शेपूट असलेल्या मेंढरांना विशेष मागणी असल्याचे दिसून आले. अशा दर्जेदार मेंढरांची किंमत लाखो रुपयांपर्यंत पोहोचत आहे.

मेंढरांच्या संगोपनासाठी मका, शेंगा, पेंढ, शिवरी आदी खाद्य दिले जाते. चांगले खाद्य, योग्य संगोपन आणि मेहनतीमुळे मेंढरांची शरीरयष्टी व गुणवत्ता सुधारत असल्याचे मेंढपाळ सांगतात. त्यामुळे उत्कृष्ट दर्जाच्या मेंढरांना बाजारात मोठी किंमत मिळत आहे. या बाजारासाठी महाराष्ट्रातील विविध भागांसह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून शेतकरी व मेंढपाळ मेंढरे घेऊन येतात. विक्रीसाठी मेंढरे आणणाऱ्यांबरोबरच चांगल्या जातीची मेंढरे खरेदी करण्यासाठीही शेतकरी उपस्थित राहतात. सांगोला तालुक्यातील धनगर समाजातील बांधवांचाही या बाजारात मोठा सहभाग आहे. गेल्या तीन वर्षांपासून बाजार भरत आहे.

सांगोल्यातील बाबू मेटकरी यांचा एक मेंढा १५ लाख रुपयांना मागितला. धष्टपुष्ट शरीरयष्टी, उंच मान, नाकावर उंचवटा चकमदार व दाट केस असलेल्या या मेंढ्याला अनेकांनी बोली लावली. एका ग्राहकाने १५ लाख रुपयांना विकत मागितला. मात्र मेटकरी यांनी विकला नाही.

पांढऱ्या मेंढरांना गुलालाने रंगवले होते. मोरपिसांनी आकर्षक सजवण्यात आले होते. बैलाप्रमाणे आकर्षक झूल घालून सजवण्यात आले होते.

सांगोला, माळशिरस, आटपाडी, जत या तालुक्यांमध्ये धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने आहेत. त्यांचा पारंपरिक मेंढीपालनाचा व्यवसाय जोमात असल्याने सांगोला परिसरात मेंढरांच्या बाजारात मोठी उलाढाल होत आहे.

वाजत-गाजत जेसीबीच्या बकेटमध्ये मेढरं घेऊन काही जण आले होते. काही मेंढपाळांनी मेंढरांसमोर हलगी वाजवत नृत्य केले. तर काहीनी वाहनांमधून मेंढरांची मिरवणूक काढली. गुलालाची उधळण आणि ढोल-हलगीच्या गजरामुळे बाजार परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *