Headlines

साकीनाका मॅनहोल दुर्घटना:महापौरांवरही कारवाई व्हायलाच हवी, सत्ताधाऱ्यांकडून केवळ कॉन्ट्रॅक्टर्सची सेवा – आदित्य ठाकरे




मुंबईतील साकीनाका येथील मॅनहोल दुर्घटनेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी महापालिका प्रशासन, भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. मुंबईत पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण झाली नसल्यामुळेच अशा दुर्घटना वारंवार घडत असल्याचा आरोप करत त्यांनी महापौरांवरही निशाणा साधला. “मुंबईच्या महापौरांना मुंबईकरांची नाही, फक्त बांग्लादेशींची काळजी आहे,” अशी जहरी टीका त्यांनी केली. माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, भाजपच्या ताब्यात गेल्यानंतर मुंबई महानगरपालिकेची पावसाळ्यापूर्वीची तयारी पूर्णपणे फसली आहे. नालेसफाई, कचरा उचलणे, मॅनहोल सुरक्षित करणे आणि पाणी तुंबण्याच्या समस्यांबाबत आपण आणि आपल्या पक्षाच्या नगरसेवकांनी वारंवार इशारा दिला होता. मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज त्याचे परिणाम मुंबईकरांना भोगावे लागत आहेत. त्यांनी सांगितले की, अनेक वॉर्डांत अजूनही नाल्यांमधील कचरा उचललेला नाही. अंधेरी सबवे, हिंदमाता परिसर आणि इतर ठिकाणी पुन्हा पाणी साचत आहे. यामुळे प्रशासनाचे नियोजन पूर्णपणे कोलमडल्याचे दिसून येते. “तिसऱ्यांदा मॅनहोल दुर्घटना” गेल्या दोन दिवसांत मॅनहोलमध्ये पडण्याच्या तिसऱ्या घटनेकडे लक्ष वेधत आदित्य ठाकरे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी महापौरांच्या उपस्थितीतच महापालिकेचा कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला होता. त्यावेळी त्या कर्मचाऱ्याची विचारपूस करण्याऐवजी त्याच्यावरच चौकशी लावण्यात आली. “मुंबईने अनेक महापौर पाहिले, पण स्वतःच्या कर्मचाऱ्यांवर संशय घेऊन चौकशी लावणारे हे पहिले महापौर असतील,” असा टोला त्यांनी लगावला. “महापौरांना फक्त बांग्लादेशींची काळजी” मुंबईत उघडे मॅनहोल, कचरा आणि पावसाळी संकटांविषयी सोशल मीडियावर सातत्याने तक्रारी येत असतानाही प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप करत आदित्य ठाकरे म्हणाले, “मुंबईची काळजी या महापौरांना नाही. त्यांना फक्त आणि फक्त बांग्लादेशींची काळजी आहे. हे मुंबईचं दुर्दैव आहे.” “प्रत्येक पावसात नवी दुर्घटना” प्रत्येक पावसाळ्यात मुंबईकरांना वेगवेगळ्या दुर्घटनांचा सामना करावा लागत असल्याचे सांगताना त्यांनी अनेक उदाहरणे दिली. विजेचा धक्का लागून मृत्यू, झाड पडून लहान मुलाचा मृत्यू, मॅनहोलमध्ये पडण्याच्या घटना, अंधेरी सबवेसह अनेक ठिकाणी पाणी तुंबणे अशा या सर्व घटनांमागे प्रशासनाचा निष्काळजीपणा असल्याचा आरोप त्यांनी केला. “शिंदेही तेवढेच जबाबदार” आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही लक्ष्य केले. नगरविकास खात्याचे मंत्री असूनही ते सभागृहात उत्तर देण्यासाठी उपस्थित राहत नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या मते, सरकारचे लक्ष मुंबईच्या समस्यांकडे नसून आमदार, खासदार आणि नगरसेवक फोडण्याच्या राजकारणात अडकले आहे. “आमदार कसे फोडायचे, खासदार कसे विकत घ्यायचे, कॉन्ट्रॅक्टरकडून पैसे कसे काढायचे हे त्यांना माहिती आहे; पण स्वतःच्या खात्याची जबाबदारी पार पाडता येत नाही,” अशी टीका त्यांनी केली. “महापौरांवर कारवाई व्हायलाच हवी” साकीनाका दुर्घटनेप्रकरणी महापौरांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. विरोधी पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली, मात्र महापौर घटनास्थळी उशिरा पोहोचल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. “महापौर नेमक्या कुठे होत्या, हा प्रश्न मुंबईकर विचारत आहेत,” असे ते म्हणाले. झाड पडून झालेल्या मृत्यूचाही मुद्दा उपस्थित दादरमध्ये झाड पडून एका मुलाचा मृत्यू झाल्याचा संदर्भ देत आदित्य ठाकरे म्हणाले की, संबंधित झाड धोकादायक असल्याची नोंद आधीच पालिकेच्या अंतर्गत पत्रव्यवहारात होती. तरीही वेळेत कारवाई झाली नाही. त्यांनी आरोप केला की, रस्त्यांच्या काँक्रीटीकरणामुळे अनेक झाडांच्या मुळांवर काँक्रीट टाकण्यात आले असून त्यामुळे झाडे अधिक धोकादायक झाली आहेत. “मुंबईची सेवा नाही, कॉन्ट्रॅक्टरांची सेवा” महापालिकेचे सत्ताधारी मुंबईकरांची सेवा करण्याऐवजी कॉन्ट्रॅक्टरांचे हित जपत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांच्या मते, ब्लॅकलिस्ट झालेल्या कंत्राटदारांनाही पुन्हा कामे दिली जात आहेत आणि त्यातूनच मुंबईच्या विकासकामांची गुणवत्ता घसरली आहे. केंद्र सरकारवरही टीका पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी अयोध्या, उज्जैन, नीट परीक्षा, टीईटी, एमपीएससी आदी विविध मुद्द्यांचाही उल्लेख करत भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र चौकशी समिती नेमण्याची मागणी त्यांनी केली. “भाजपला प्रचार करता येतो, पण प्रशासन चालवता येत नाही” हिंदीत बोलताना त्यांनी भाजपवर आणखी टीका करत म्हटले की, पाऊस हा आनंद घेऊन येतो; मात्र मुंबईत भाजपच्या कारभारामुळे तो भीती घेऊन येत आहे. “भाजपला प्रचार करता येतो, लोकांमध्ये गैरसमज पसरवता येतात; पण प्रशासन चालवता येत नाही. देशात भाजपच्या कारभाराखाली विकसित झालेलं एक तरी शहर दाखवा,” असे खुले आव्हान त्यांनी दिले. हे ही वाचा… मुंबईत 25 फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू:फोनवर बोलत चालली होती व्यक्ती, दुसऱ्या मॅनहोलमध्ये सापडला मृतदेह, 4 अधिकाऱ्यांचे निलंबन मुंबईत एकीकडे पावसाने हाहाकार उडवला असताना, दुसरीकडे पालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे निष्पाप मुंबईकरांचे बळी जात आहेत. कुर्ला-साकीनाका परिसरातील खैराणी रोडवर मोबाईलवर बोलत चाललेल्या एका 45 वर्षीय व्यक्तीचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. असलम अन्सारी असे या मृत व्यक्तीचे नाव असून, या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या या निष्काळजीपणावर चहुबाजूंनी संताप व्यक्त होत आहे. सविस्तर वाचा… साकीनाका मॅनहोल दुर्घटनेत मोठा खुलासा:सुरक्षिततेसाठी मॅनहोल उघडला, पण नियमच पाळले नाहीत; पालिका आयुक्त अश्विनी भिडेंची कबुली साकीनाका येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनेनंतर मुंबई महापालिका प्रशासनाने मोठा खुलासा केला आहे. ही दुर्घटना मॅनहोल सुरक्षित करण्यासाठी जाळी बसविण्याचे काम सुरू असतानाच घडली, मात्र कामादरम्यान आवश्यक सुरक्षा उपायांचे पालन करण्यात आले नाही, अशी कबुलीच मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या घटनेची गंभीर दखल घेत महापालिकेने संबंधित चार अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित केले असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *