![]()
साकीनाका येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनेनंतर मुंबई महापालिका प्रशासनाने मोठा खुलासा केला आहे. ही दुर्घटना मॅनहोल सुरक्षित करण्यासाठी जाळी बसविण्याचे काम सुरू असतानाच घडली, मात्र कामादरम्यान आवश्यक सुरक्षा उपायांचे पालन करण्यात आले नाही, अशी कबुलीच मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या घटनेची गंभीर दखल घेत महापालिकेने संबंधित चार अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित केले असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. मुंबईतील 96 हजारांहून अधिक मॅनहोलवर सुरक्षा जाळ्या पत्रकार परिषदेत बोलताना आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले की, मुंबईतील स्टॉर्म वॉटर ड्रेन (SWD) आणि मलनिसारण विभागाच्या अखत्यारीत एकूण 1 लाख 3 हजार 926 मॅनहोल आहेत. त्यापैकी 96 हजार 383 मॅनहोलवर सुरक्षा जाळ्या बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. रस्त्यांच्या विकासकामांमुळे सुमारे 1,800 हून अधिक मॅनहोल कायमस्वरूपी बुजविण्यात आले, तर काही ठिकाणी काम सुरू असल्यामुळे जाळ्या तात्पुरत्या काढाव्या लागल्या होत्या. अशा सुमारे 4,446 मॅनहोलवर पुन्हा जाळ्या बसविण्याचे काम सुरू असून ते टप्प्याटप्प्याने पूर्ण केले जात आहे. एल वॉर्डमध्ये फक्त चार मॅनहोल बाकी; त्यातीलच एकावर दुर्घटना साकीनाका येथील घटना एल वॉर्डमध्ये घडली. काही दिवसांपूर्वी या विभागात 75 मॅनहोलवर जाळ्या बसविण्याचे काम बाकी होते. मात्र, ताज्या अहवालानुसार ते काम जवळपास पूर्ण झाले असून केवळ चार मॅनहोलवर जाळ्या बसविणे शिल्लक होते.दुर्दैवाने ज्या मॅनहोलवर जाळी बसविण्याचे काम सुरू होते, त्याच ठिकाणी ही दुर्घटना घडल्याचे भिडे यांनी स्पष्ट केले. ‘कॉन्ट्रॅक्टरने सुरक्षेचे नियमच पाळले नाहीत’ महापालिका आयुक्तांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, मॅनहोल उघडून काम करताना संबंधित कंत्राटदार, त्यांचे कामगार आणि पर्यवेक्षक यांनी आवश्यक सुरक्षितता उपाययोजना करणे बंधनकारक होते. त्यासाठी परिसरात बॅरिकेड्स लावणे, ट्रायपॉड किंवा इशारा व्यवस्था उभारणे, स्पष्ट चेतावणी फलक लावणे, पादचाऱ्यांना सुरक्षित मार्ग दाखविणे या सर्व बाबी आवश्यक होत्या. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमध्ये यापैकी कोणतीही प्रभावी सुरक्षा व्यवस्था दिसून आली नाही. फक्त दोन कर्मचारी उभे होते, मात्र घाईत जाणाऱ्या पादचाऱ्यांना त्यांचा इशारा समजला नाही आणि संबंधित व्यक्ती थेट उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. पावसाळ्यापूर्वीच काम पूर्ण करण्याचे आदेश होते भिडे यांनी सांगितले की, गेल्या तीन महिन्यांपासून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सातत्याने बैठका घेण्यात आल्या होत्या. प्रत्येक मॅनहोलवर जाळी आणि झाकण असल्याची खात्री करण्याचे आदेश देण्यात आले होते. विशेषतः रस्त्यांच्या कामामुळे उघडलेल्या मॅनहोलवर 31 मेपूर्वी जाळ्या बसविण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, काही प्रलंबित कामे शिल्लक राहिली आणि त्याच कामादरम्यान निष्काळजीपणा झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे त्यांनी मान्य केले. उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी महापालिकेने अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीत संबंधित विभागाचे उपायुक्त आणि पायाभूत सुविधा विभागाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी असतील. समिती कंत्राटदार, पर्यवेक्षक, विभागीय अधिकारी आणि कामाच्या प्रक्रियेची सविस्तर चौकशी करून जबाबदारी निश्चित करणार आहे. चार अधिकाऱ्यांचे निलंबन या घटनेप्रकरणी माहिती देताना मुंबईच्या महापौर रितू तावडे म्हणाल्या की, मी कोणाची पाठराखण करत नाहीये, अश्विनी भिडे असोत वा मी असो आम्ही वारंवार अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या होत्या. ऑन द स्पॉट संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याची ऑर्डरही मी सोबत आणली आहे. निलंबित केलेल्यांमध्ये धनाजी हेर्लेकर सहायक आयुक्त, दीपक चौघुले दुय्यम अभियंता परीरक्षण, अभिजीत चौघुले कनिष्ठ अभियंता, उत्तम पाटील सहायक अभियंता या चार अधिकाऱ्यांना ऑन द स्पॉट निलंबित करण्यात आले आहे. याचबरोबर मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची भरपाई देण्याबाबतही मी पालिका प्रशासनाला सांगतले असल्याचे महापौर रितू तावडे म्हणाल्या. निष्काळजीपणा करणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे. ‘दोन वर्षांपूर्वी टेंडर झाले, मग काम वेळेत का पूर्ण झाले नाही?’ दरम्यान, महापौर ऋतु तावडे यांनीही पत्रकार परिषदेत प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दोन वर्षांपूर्वीच मॅनहोल जाळ्यांचे टेंडर मंजूर झाले होते, तर पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण का झाली नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या संदर्भात प्रशासनाकडून स्पष्टीकरण मागविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कंत्राटदार बदलल्याने कामात विलंब यावर उत्तर देताना आयुक्त अश्विनी भिडे म्हणाल्या की, काही विभागांमध्ये कंत्राटदारांनी काम अर्धवट सोडल्यामुळे वारंवार नवीन कंत्राटदार नेमावे लागले. त्यामुळे काही कामांना विलंब झाला. मात्र, उर्वरित सर्व ठिकाणी नालेसफाई आणि मॅनहोल सुरक्षेची कामे सुरू असून पावसाळ्यात वाहून येणारा गाळ काढण्याचे कामही सातत्याने सुरू आहे. निष्काळजीपणामुळे जीव गेला; आता जबाबदारी निश्चित होणार साकीनाका दुर्घटनेनंतर महापालिकेने प्रथमच उघडपणे मान्य केले आहे की, मॅनहोल सुरक्षित करण्याचे काम सुरू असतानाच आवश्यक सुरक्षा नियमांचे पालन करण्यात आले नाही. त्यामुळेच ही दुर्घटना घडली. आता चौकशी समितीच्या अहवालानंतर संबंधित कंत्राटदार, पर्यवेक्षक आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर आणखी कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे ही वाचा… मुंबईत 25 फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू:फोनवर बोलत चालली होती व्यक्ती, दुसऱ्या मॅनहोलमध्ये सापडला मृतदेह, 4 अधिकाऱ्यांचे निलंबन मुंबईत एकीकडे पावसाने हाहाकार उडवला असताना, दुसरीकडे पालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे निष्पाप मुंबईकरांचे बळी जात आहेत. कुर्ला-साकीनाका परिसरातील खैराणी रोडवर मोबाईलवर बोलत चाललेल्या एका 45 वर्षीय व्यक्तीचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. असलम अन्सारी असे या मृत व्यक्तीचे नाव असून, या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या या निष्काळजीपणावर चहुबाजूंनी संताप व्यक्त होत आहे. सविस्तर वाचा…
Source link
साकीनाका मॅनहोल दुर्घटनेत मोठा खुलासा:सुरक्षिततेसाठी मॅनहोल उघडला, पण नियमच पाळले नाहीत; पालिका आयुक्त अश्विनी भिडेंची कबुली