![]()
पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवातील सातव्या माळेनिमित्त शनिवारी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ऑक्टोबर महिन्यातील उन्हाचा तडाखा आणि दुष्काळी परिस्थितीची पर्वा न करता भाविकांनी मोहटादेवी मातेच्या दर्शनासाठी गडावर हजेरी लावली. दिवसभर सुरू असलेल्या भाविकांच्या गर्दीमुळे संपूर्ण गड परिसर भक्तिमय झाला होता. देवीच्या जयघोषाने गड दुमदुमून गेला होता. सहाव्या माळेपासूनच मोहटादेवी गडाकडे भाविकांचा ओघ वाढला होता. सातव्या माळेला विशेष महत्त्व असल्याने राज्याच्या विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले. नवसपूर्ती, पूजा-अर्चा आणि देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. उन्हाची तीव्रता जाणवत असतानाही भाविकांचा उत्साह कायम होता. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन वाहतुकीचे नियोजन करण्यात आले होते. बीड राज्य महामार्गापासून मोहटादेवी गडाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर पाच ठिकाणी गेट उभारून मोठ्या वाहनांची वाहतूक टप्प्याटप्प्याने नियंत्रित करण्यात आली. खासगी पार्किंग चालकांची काही ठिकाणी मनमानी पाहायला मिळाली त्यामुळे अनेक भाविकांना याचा त्रास सहन करावा लागला. गडाकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण झाल्याने भाविकांच्या प्रवासाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलीस, सुरक्षारक्षक आणि स्वयंसेवक विविध ठिकाणी तैनात होते. महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शनव्यवस्था करण्यात आली होती. स्वयंसेवकांच्या मदतीने रस्त्यांची स्वच्छता राखण्यावरही भर देण्यात आला होता. दुष्काळी परिस्थिती आणि वाढत्या उन्हामुळे भाविकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवू नये यासाठी देवस्थान ट्रस्टच्यावतीने नियोजन करण्यात आले होते. उन्हाचा तडाखा वाढल्याने थंड पदार्थ, शीतपेये आणि थंड पाण्याच्या बाटल्यांना मोठी मागणी होती. पाथर्डी आगारासह विविध एसटी आगारांच्यावतीने भाविकांच्या सोयीसाठी विशेष बसव्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती. पाथर्डी ते मोहटादेवीगड मार्गावर ठिकठिकाणी भाविकांच्या सेवेसाठी मोफत फराळाचे स्टॉल उभारण्यात आले होते. मोहटादेवी येथे खासदार नीलेश लंके यांच्या उपस्थितीत देवीभक्तांसाठी मोफत फराळ, चहा आणि पाण्याचे वाटप करण्यात आले. त्यामुळे पायी येणाऱ्या भाविकांना दिलासा मिळाला. सातव्या माळेनिमित्त राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.भाविकांच्या महापुरामुळे परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती. दुष्काळ अन् उन्हाच्या तीव्रतेतही अलोट गर्दी एकीकडे दुष्काळाचे सावट तर दुसरीकडे उन्हाची तीव्रता अशा प्रतिकूल परिस्थितीतही मोहटादेवीवरील भाविकांची श्रद्धा आणि उत्साह कायम असल्याचे सातव्या माळेच्या गर्दीतून दिसून आले. नवरात्रोत्सवाच्या पुढील दिवसांतही भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने देवस्थान ट्रस्ट आणि संबंधित यंत्रणांकडून व्यवस्थेवर विशेष लक्ष दिले जात आहे.
Source link
सातव्या माळेला मोहटा देवी गडावर राज्यभरातील भाविकांची मांदियाळी:देवी मातेच्या जयघोषाने मोहटादेवी गड दुमदुमला