![]()
सातारा शहरात साखळीचोरीच्या घटना पुन्हा डोके वर काढू लागल्या असून केसरकर पेठ परिसरात भरदिवसा एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सुमारे ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात चोरट्याने हिसकावून नेल्याची घटना घडली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शकुंतला धनाजीराव शिंदे (वय ७५, रा. चारभिंती रोड, केसरकर पेठ) या समर्थ मंदिराकडून घरी पायी जात होत्या. घोरपडे कार्यालयासमोरील सार्वजनिक गणेशोत्सव मंडप उभारणीच्या ठिकाणाजवळ पोहोचताच एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सुमारे १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण झडप घालून हिसकावले आणि क्षणार्धात पसार झाला. या घटनेप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार भोंडवे पुढील तपास करीत आहेत. फरशीचे पाणी ठरले वादाचे कारण घरातील फरशी धुतल्यानंतरचे पाणी गेटबाहेर टाकण्याच्या किरकोळ कारणावरून शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादाने हिंसक वळण घेतल्याची घटना संगमनगर येथील पंचवटी कॉलनीत घडली. या प्रकरणात एका महिलेसह तिच्या आईला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत चौघांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादी देवयानी बाळकृष्ण लवंगारे यांच्या तक्रारीनुसार, शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास शेजाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर मीना शंकर पवार, विकास शंकर पवार, आदित्य मनोहर पवार आणि बाली मनोहर पवार यांनी शिवीगाळ करत हाताने व काठीने मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेचा तपास महिला पोलीस हवालदार सावंत करीत आहेत. पुलाखाली चेहरा झाकून संशयास्पद हालचाल, युवकाविरुद्ध बोरगाव पोलिसांची कारवाई नागठाणे येथील राष्ट्रीय महामार्गावरील पुलाखाली चेहरा रुमालाने झाकून संशयास्पदरीत्या वावरत असलेल्या एका युवकाला बोरगाव पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कॉन्स्टेबल केतन जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास नफिज अलीम खान (वय २९, रा. नागठाणे) हा पुलाखाली संशयास्पद अवस्थेत आढळून आला. अंधाराचा फायदा घेत चेहरा रुमालाने झाकून स्वतःची ओळख लपविण्याचा प्रयत्न केल्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्याच्यावर संबंधित कायद्यानुसार कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक शेख करीत आहेत.
Source link
सातारा गुन्हेगारी वार्ता:केसरकर पेठेत भरदिवसा हिसका, 75 वर्षीय महिलेचे सोन्याचे गंठण चोरट्याने पळविले