![]()
औंढा नागनाथ तालुक्यातील मौजे दुधाळा येथे प्रस्तावित लिगो इंडिया प्रकल्पाच्या अनुषंगाने शासन निर्णयानुसार लागू करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे निर्बंध शिथील करण्याच्या मागणीवर लिगो एम्पावर्ड बोर्डाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन अणुऊर्जा व संशोधन विकास विभागाचे संचालक नितीन जावळे यांनी सोमवारी ता. २७ दिले आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात लिगो प्रकल्पाच्या पार्श्वभुमीवर बैठक झाली. यावेळी अणुऊर्जा संशोधन व विकास विभागाचे संचालक नितीन जावळे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, लिगो इंडिया प्रकल्प समन्वयक समीर जाधव, जिल्हा खनिकर्म अधिकारी आश्विनकुमार माने, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक रविंद्र पत्की, उद्योग समूह संघटनेचे ज्ञानेश्वर मामडे, प्रविण सोनी, नितीन राठोड, रमेश पंडित तसेच जिल्ह्यातील स्टोन क्रशर उद्योजकही बैठकीस उपस्थित होते. या बैठकीत लिगो इंडिया प्रकल्पाच्या सीमारेषेपासून पाच ते ६० किलो मिटर परिसरात लागू असलेल्या विविध निर्बंधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. स्टोन क्रेशर, खाणकाम, ब्लास्टिंगवर आधारित उद्योग, २० अश्वशक्तीपेक्षा अधिक ऊर्जा लागणारे रेसिप्रोकेटिंग क्रियाकल्प, नवीन वीज प्रकल्प, नवीन रेल्वे मार्ग तसेच पवनचक्की उभारणीवरील निर्बंधांबाबत सखोल चर्चा करण्यात आली. हिंगोली जिल्ह्याच्या औद्योगिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळावी, यासाठी लिगो इंडिया प्रकल्प कार्यान्वित होईपर्यंत संबंधित निर्बंध शिथिल करण्यात यावेत तसेच काही निर्बंधांमध्ये अंशतः सूट देण्यात यावी, अशी विनंती जिल्हा प्रशासन व उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आली. यावर संचालक नितीन जावळे यांनी जिल्हा प्रशासन व उद्योग प्रतिनिधींनी मांडलेल्या सूचनांवर लिगो इंडिया एम्पावर्ड बोर्डाच्या बैठकीत सविस्तर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिले. त्यानंतर जावळे यांच्या पथकाने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्यासमवेत लिंबाळा एमआयडीसी परिसरातील कीर्ती गोल्ड, शिवपार्वती ऑईल मिल तसेच पंचतत्त्व उद्योगांना भेट देऊन उत्पादन प्रक्रिया, बाटली निर्मिती व पाणी शुद्धीकरण प्रक्रियेची पाहणी केली. तसेच औंढा नागनाथ तालुक्यातील मौजे दुधाळा येथील प्रस्तावित लिगो इंडिया प्रकल्प स्थळालाही भेट देऊन तेथील परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला.
Source link
हिंगोलीतील लिगो प्रकल्पाजवळील निर्बंध लवकरच शिथिल होणार?:जिल्हाधिकारी आणि उद्योजकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक