![]()
सटाणा नगरपरिषद सेवक गणेशोत्सव मंडळाने विसर्जन मिरवणुकीत त्र्यंबकेश्वर येथील ‘आधारतीर्थ’ अनाथ आश्रमातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मदत फेरी काढली. पारंपरिक डीजे व गुलालाला फाटा देत, टाळ-मृदंग आणि संबळाच्या गजरात बैलगाडीतून मिरवणूक काढली. या मदत फेरीत नागरिकांनी धान्य, किराणा, शैक्षणिक साहित्य, कपडे, चप्पल यांसह रोख रकमेच्या स्वरूपात मदत केली. या प्रसंगी नगराध्यक्षा हर्षदा पाटील यांनी नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी, विभागप्रमुख व सेवकवृंदाच्या वैयक्तिक खर्चातून आश्रमातील २०० मुलांसाठी कपडे व शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी जलशुद्धीकरण यंत्र देण्याची घोषणा केली. आश्रमाचे संस्थापक त्र्यंबकराव गायकवाड यांनी आश्रमाला वेळोवेळी हातभार लावणाऱ्या सर्व दानशूरांचे आभार मानले. आधारतीर्थच्या मुलांनी चौकाचौकात समाजप्रबोधन केले. “आमच्या आई-वडिलांनी आत्महत्या करून जी चूक केली, ती तुम्ही करू नका, अशा आशयाचे फलक हातात धरून त्यांनी समाजाला आत्महत्येविरोधात जागृतीची साद घातली. पुणे जिल्ह्यातील चिमुकली राधिका साबळे हिने जेव्हा ‘सोडून गेली आई स्वर्गाला, कोण वागवील तुझ्या मुलीला…’ हे आर्त गीत सादर केले, तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले. तर ओम या बालकाने, “माझ्याकडे बघून तरी कुणी आत्महत्या करू नका,” असे आवाहन करत केलेले मनोगत सर्वांच्या काळजाला भिडले.
Source link
‘आधारतीर्थ’ आश्रमासाठी मदत फेरी:सटाणा नगरपरिषदेच्या सेवक मंडळाची विसर्जन मिरवणूक