Headlines

कृषी विभागाची पाहणी:पैठणमध्ये खरिपाच्या उत्पादनात 50 टक्क्यांहून अधिक घट होणार, सरासरीच्या तुलनेत यंदा 114.3 मिमी पाऊस कमी‎




पैठण तालुक्यात यंदा पावसाने दिलेल्या ओढीमुळे खरीप हंगाम पार कोलमडला आहे. तालुक्यात सरासरी ४७१.३ मिमी पावसाच्या तुलनेत १८ सप्टेंबरपर्यंत अवघा ३५७ मिमी पाऊस झाला असून, तब्बल ११४.३ मिमीची तूट नोंदवण्यात आली आहे. त्यातच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या केवळ २० ते ३० टक्केच पाऊस झाल्याने अनेक भागांत ११ ते तब्बल ४२ दिवसांचा मोठा खंड पडला आहे. या दीर्घ खंडाचा थेट फटका पिकांच्या वाढीला बसला आहे. तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाच्या पथकाने केलेल्या पाहणीत खरीप उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाअभावी कापसाची वाढ खुंटली असून पातेगळ वाढली आहे. ओलावा कमी झाल्यामुळे रसशोषक किडी आणि विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे कापसाच्या उत्पादनात ५० ते ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होण्याची भीती आहे. उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांचा लागवड व मशागतीचा खर्च निघणेही कठीण झाले आहे. सोयाबीन पीक ऐन दाणे भरण्याच्या टप्प्यात असतानाच पावसाने दडी मारली. जमिनीतील ओलावा संपल्याने शेंगांमध्ये दाणे भरण्याचे प्रमाण कमालीचे घटले आहे. याचा थेट परिणाम सोयाबीनच्या एकूण उत्पन्नावर होणार आहे. काही भागांत तब्बल ४२ दिवसांचा खंड पडल्याने जमिनीतील ओलावा गंभीर पातळीवर घसरला आहे. पुढील काही दिवसांत पाऊस झाला नाही, तर आगामी रब्बी हंगामातील पेरण्या धोक्यात येतील. तसेच, खरिपाचे उत्पादन घटल्याने जनावरांच्या चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. कृषी विभागाने बांधावर जाऊन केले मार्गदर्शन कृषी विभागाचे पथक प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करत असून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे. पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाल्यास शेतकऱ्यांनी तात्काळ मंडळ कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी किंवा सहायक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *