Headlines

साताऱ्यात वकिलावर जीवघेणा हल्ला:कॅबिनेट मंत्री मकरंद पाटील यांच्या मुलावर गंभीर आरोप करत वकिलाची पोलिस अधीक्षकांकडे धाव




सातारा शहरात एका वकिलाला कार्यालयात बोलावून घेतल्यानंतर मारहाण, धमकी, शिवीगाळ आणि लूटमार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सातारा येथील वकील ॲड. शाहिद शहाबुद्दीन इनामदार यांनी 9 सप्टेंबर 2026 रोजी सातारा शहर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज दाखल केला असून, त्याची प्रत सातारा जिल्हा पोलिस अधीक्षकांनाही दिली आहे. तक्रारीनुसार, 5 सप्टेंबर 2026 रोजी कॅबिनेट मंत्री मकरंद पाटील यांचा मुलगा आहान पाटील यांनी ॲड. शाहिद इनामदार यांना त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मित्र राजेश पवार उपस्थित असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारीतील प्रमुख आरोप काय? तक्रारीनुसार, 5 सप्टेंबर 2026 रोजी आहान पाटील यांनी ॲड. इनामदार यांना त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या राजकारणावरून व कामेश कांबळे यांच्याबाबत प्रश्न विचारत आहान पाटील यांनी त्यांना धमकी दिली आणि प्रशांत साळुंखे , सुजस येवले, नितीन शिंदे, रोहित शिंदे आणि संतोष येवले यांच्यासह इतर 7 ते 10 कार्यकर्त्यांनी ॲड. इनामदार यांना बेदम मारहाण केली. तसेच, जबरदस्तीने पाया पडून माफी मागायला लावल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मारहाणीदरम्यान हातातील सुमारे 1 लाख रुपयांची सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेण्यात आली. तू ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा माणूस आहेस, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. गुन्हा दाखल करण्यास उशीर? घटना 5 सप्टेंबर रोजी घडलेली असताना 9 सप्टेंबरपर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता, असा दावा ॲड. इनामदार यांनी केला आहे. सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्याकडे दाद न मिळाल्याने त्यांनी थेट जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली आहे. प्रशासकीय निष्पक्षतेची मागणी ॲड. शाहिद इनामदार हे साताऱ्यातील अल्पसंख्याक समाजातील नामांकित वकील असून गरजू नागरिकांना मोफत कायदेशीर मदत देण्यासाठी ओळखले जातात. सध्या या प्रकरणातील सत्यता पडताळण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज, वैद्यकीय अहवाल आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाची तपासणी पोलिसांकडून होणे गरजेचे असून, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष पोलिस प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *