![]()
समाजातील विविध प्रश्न व समस्या वादातून नव्हे, तर विचारमंथन, संवाद आणि परस्पर समन्वयातून सोडवल्या जाऊ शकतात. सामाजिक सद्भाव हा केवळ विचार नसून तो व्यक्ती, कुटुंब आणि समाजाच्या आचरणातून निर्माण होणारा संस्कार आहे, असे प्रतिपादन स्वानंद कुलकर्णी यांनी केले.ते लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, मंगळवेढा येथे रविवार, ६ सप्टेंबर रोजी सामाजिक सदभाव बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी बोलत होते. यावेळी सकल हिंदू समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक सदभाव, पंचपरिवर्तन, सांस्कृतिक जाणीव, कुटुंब प्रबोधन आणि नागरिक कर्तव्य या विषयांवर बैठकीत विचारमंथन करण्यात आले. यावेळी स्वानंद कुलकर्णी म्हणाले, भारतीय संस्कृतीची ओळख विविधतेतील एकतेत आहे. रामायण, महाभारत आणि भारतीय ज्ञानपरंपरेतून समाजाला एकत्र ठेवणारे अनेक विचार मिळतात. आजच्या पिढीला आपल्या मूळ संस्कृतीपासून दूर नेण्याचे प्रयत्न होत असताना तरुणांनी वास्तव समजून घेऊन राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. समाजातील दोष दूर करण्यासाठी वादापेक्षा संवाद आणि एकत्रीकरणाची भूमिका महत्त्वाची आहे, असे त्यांनी सांगितले. तालुका संयोजक दिगंबर यादव यांनी प्रास्ताविकात हिंदू धर्माचे विचार व श्रेष्ठत्व, संत-राजांची परंपरा तसेच भक्ती आणि शक्ती परंपरेचे महत्त्व विशद केले. छत्रपती संभाजी महाराज, संत जगनाडे महाराज, संत रविदास महाराज व संत गोरा कुंभार यांचे कार्य तसेच धनगर, गिसाडी, वैदू, नाथ डवरी, रामोशी, मेहतर यांसह विविध समाजघटकांचे योगदान त्यांनी अधोरेखित केले. दरम्यान सर्व उपस्थितांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी पेरूचे रोप भेट देण्यात आले. याप्रसंगी एकात्मता मंत्र व सांघिक पद्य ओंकार चिटणीस यांनी सादर केले. सूत्रसंचालन सागर पवार तर आभार दामाजी पडवळे यांनी मानले. पंचपरिवर्तनाच्या सूत्रांवर प्रत्येकाने काम करावे जिल्हा संयोजक विजय वाघमोडे म्हणाले, मजबूत राष्ट्रनिर्मितीसाठी समाजातील विविध जाती, संस्था आणि घटकांचे एकत्रीकरण आवश्यक आहे. यासाठी स्वबोध, पर्यावरण, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता आणि नागरिक कर्तव्य या पंचपरिवर्तनाच्या सूत्रांवर प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनातून काम करणे गरजेचे आहे. ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Source link
सामाजिक सद्भावातूनच होते समाजातील प्रश्नांची उकल:मंगळवेढा येथे बैठकीत कुलकर्णी यांचे प्रतिपादन