![]()
स्थानिक पातळीवर उत्तम आणि पारदर्शक लोकसेवा देणाऱ्या राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. नगरपरिषदेच्या महत्त्वाच्या ‘श्री त्रिंबकराज मोफत वाचनालय’ आणि ‘पाणीपुरवठा विभाग’ या दोन्ही विभागांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे ISO 9001:2015 गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली प्रमाणपत्र बहाल करण्यात आले आहे. या कामगिरीमुळे देवळाली प्रवरा शहराच्या कार्यक्षम आणि गुणवत्तापूर्ण कारभाराची दखल घेतली गेली आहे. आयएसओ प्रमाणपत्रामुळे नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सेवा निर्धारित गुणवत्ता निकषांनुसार आणि अधिक शिस्तबद्ध पद्धतीने दिल्या जात असल्याचे अधोरेखित झाले आहे. नगरपरिषदेने शुद्ध, नियमित व गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठ्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. सन १९५६ पासून हजारो वाचकांना ज्ञानसमृद्ध करणारे आणि १९६० मध्ये शासनमान्य ‘अ’ दर्जा प्राप्त झालेले श्री त्रिंबकराज मोफत वाचनालयही या मानांकनामुळे चर्चेत आले आहे. स्पर्धा परीक्षा, कथा-कादंबऱ्या, शेती, कायदे, इतिहास, अध्यात्म आदी विषयांवरील विपुल ग्रंथसंपदेचा लाभ वाचकांना मिळत आहे. ग्रंथपाल संभाजी वाळके यांच्या मार्गदर्शनाखालील अभ्यासिकेत दररोज शेकडो विद्यार्थी अभ्यास करतात. आयएसओ मानकांमुळे या सेवांमध्ये आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. मेहनतीचे फलित ^“गेल्या सात-आठ वर्षांत अधिकारी, कर्मचारी आणि सहकाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. हा बहुमान संपूर्ण देवळाली प्रवरा शहरवासीयांचा आहे.” -सत्यजित कदम, नगराध्यक्ष देवळाली प्रवरा नगरपरिषदेची त्रिंबकराज वाचनालय अद्यावत इमारत
Source link
देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्याशिरपेचात ‘आयएसओ’चे मानांकन:त्रिंबकराज मोफत वाचनालय व पाणीपुरवठा विभागाला आयएसओ प्रमाणपत्र