![]()
सिल्लोड तालुक्यातील सारोळा येथे पाडव्याच्या शुभमुहूर्तावर (शुक्रवार, दि. ११) श्री संत गहिनीनाथ महाराजांची भव्य यात्रा मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडली. गहिनीनाथ महाराजांच्या दर्शनासाठी मराठवाड्यासह खानदेशातील कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. यंदा हजारो शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा-राजाच्या बैलजोड्यांसह यात्रेत सहभाग नोंदवल्यामुळे यात्रेची शोभा द्विगुणित झाली. यात्रेनिमित्त सारोळ्यात कपडे, खेळणी, खाद्यपदार्थ व संसारोपयोगी वस्तूंची मोठी बाजारपेठ सजली होती. मात्र, यंदाच्या दुष्काळी परिस्थितीचा फटका थेट व्यापाऱ्यांना बसला. जनसागर लोटला असला तरी हातात खेळता पैसा नसल्याने शेतकऱ्यांनी खरेदीकडे पाठ फिरवली. परिणामी, विक्रेत्यांना अपेक्षित व्यवसाय झाला नाही. यात्रेदरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अजिंठा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पवन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस प्रशासनाने चोख नियोजन केले होते. ४ पोलिस अधिकारी, ३० पोलिस कर्मचारी, ५० होमगार्ड आणि आरसीपी पथकाचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सारोळा येथे श्री संत गहिनीनाथ महाराजांची यात्रा पार पडली. पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा, परिसर दुमदुमला पहाटेच्या सुमारास संत गहिनीनाथ महाराजांच्या महापूजा व अभिषेकाने उत्सवाला सुरुवात झाली. मराठवाड्यातून भाविक कुटुंबीयांसह दाखल झाले होते. ‘गहिनीनाथ महाराज की जय’च्या जयघोषाने संपूर्ण सारोळा नगरी दुमदुमून गेली होती. नवसपूर्तीसाठी आलेल्या भाविकांनी पूजा-अर्चा करून दर्शन घेतले. यात्रेचे मुख्य आकर्षण असलेले १५ तगात्रा व बलखांब हे पारंपरिक धार्मिक विधी पार पडल्यामुळे उत्सवातील रंगत अधिकच वाढली.
Source link
सारोळा येथे संत गहिनीनाथ महाराजांची यात्रा उत्साहात:सर्जा-राजाच्या जोड्या अन् लाखो भाविकांची मांदियाळी